करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाबरोबरच प्लाझ्मा उपचारही केले जात आहेत. सरकारने विविध रुग्णालयात उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका रुग्णालयांमध्येही प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. अशातच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय नावाच्या गोंधळामुळे दुसऱ्याच रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाधित रुग्णाला प्लाझ्मा न देता बिगर कोविड रुग्णाला प्लाझ्मा चढवण्यात आल्यानं दोन्ही रुग्णांच्या जिवाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाईंदर पश्विम परिसरातील महानगरपालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात ३० मार्च रोजी तुलसीराम पांड्या या ४८ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याने उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे ५ एप्रिल रोजी प्रथम या रुग्णाला प्लाझ्मा चढवण्यात आला. मात्र तरी देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे पुन्हा ६ एप्रिलला प्लाझ्माची आवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली. त्यानुसार रुग्णाच्या भावाने ४० हजार रुपये खर्च करून प्लाझ्माची व्यवस्था केली. प्लाझ्मा रुग्णालयाकडे सुपूर्द केला. मात्र याच वेळी ६ एप्रिलला रुग्णालयात तुलसीदास नावाचे दुसरे रुग्ण दाखल झाले. या रुग्णाचा करोना अहवाल प्रलंबित आहे. यातच ‘तुलसीदास’ यांना ‘तुलसीराम’ समजून प्लाझ्मा चढवण्यात आला. नावाच्या गोंधळातून झालेल्या प्रकारामुळे दोन रुग्णांचा जिव धोक्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

“माझ्या भावाला तत्काळ प्लाझ्माची अवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी केली होती. आता या गोंधळामुळे १२ तासांपासून त्याला प्लाझ्मा देण्यात आलेला नाही. आता रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर जबाबदार कोण?” असा सवाल तुलसीराम यांचा भाऊ रोहित पांड्या यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे “ही घटना समोर आली असून, आता सध्या केवळ रुग्णांना योग्य उपचार देण्याकडे आमचा भर आहे. तसेच या संदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल,”
असं पं. भीमसेन जोशी रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तेजश्री सोनावणे यांनी सांगितलं आहे.