News Flash

गंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही

मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

शैलजा तिवले /इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : गंभीर प्रकृतीच्या किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील करोनाबाधित रुग्णांना रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचार विशेष फायदेशीर नाही. योग्य रुग्णावर योग्य वेळी याचा वापर केल्यास निश्चित फायदा आहे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे मृत्युदर कमी होणे किंवा रुग्णांची प्रकृती सुधारण्यास रक्तद्रव उपचाराने मदत होत नसल्याचे भारतीय संशोधन परिषदेने नुकतेच स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मात्र रक्तद्रवाची मागणी वाढली असून, समाजमाध्यमांवर याबाबत अनेक संदेश फिरत आहेत. विशेष म्हणजे मुंबईपेक्षा महानगर आणि बाहेरील जिल्ह्य़ांतून अधिक मागणी आहे.

अनेक ठिकाणी गंभीर रुग्णांना किंवा कोणत्याही औषधोपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांवर खासगी रुग्णालयांत रक्तद्रव उपचार पद्धतीचा अधिकतर वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेही मागणी वाढल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या शरीरावर संसर्गामुळे आधीच परिणाम झालेला असतो. अशा रुग्णांसाठी रक्तद्रव उपचार उपयुक्त नाहीत. प्रकृती गंभीर होण्याआधीच म्हणजे पाचव्या किंवा सातव्या दिवशी रक्तद्रव देणे आवश्यक आहे. योग्य रुग्णाला योग्य वेळी हे उपचार दिल्यास फायदा होत असल्याचा अनुभव संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आणि राज्याच्या करोना विशेष कृती दलाचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितला.

नागपूरसाठी १०० पिशव्या..

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे रक्तद्रवदान शिबीर आणि रुग्णांनी दान केलेला रक्तद्रव यातून जवळपास ३०० पिशव्या जमा झाल्याने याचा वापर अन्य रुग्णालयांत करण्याची परवानगी पालिकेने दिली. त्यामुळे रक्तद्रव मागणीसाठी पालिका रुग्णालयांवर दबाव येत आहे. नागपूरसाठी प्लाटिना प्रकल्पातून मुंबई पालिकेच्या रुग्णालयांतील १०० पिशव्यांची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.

निकष असे..

मध्यम प्रकृतीच्या रुग्णांना मार्गदर्शक सूचीनुसार ‘स्टिरॉईड’सह औषधोपचार देऊनही बाहेरील ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्यास रक्तद्रव उपचार द्यावेत.  गरोदर किंवा स्तनपान करत असलेल्या महिलेला रक्तद्रव उपचार देऊ नयेत. अतिगंभीर रुग्णाला आणि रक्ताशी संबंधित अलर्जी असल्यास किंवा गेल्या ३० दिवसांत रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन्स’ दिले असल्यास हे उपचार देऊ नये, असे निकष ठरविण्यात आल्याचे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

फायदा कोणास? : रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि बाहेरून द्यावा लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण २०० ते १५० च्या खाली असेल, अशाच रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर असल्याचे आढळत आहे. रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर जाऊ नये यासाठी रक्तद्रव हा पर्यायी उपचार नाही, असे विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी अधोरेखित केले.

योग्य वापर व्हावा!

मुंबई पालिकेने नियमावली निर्देशित केली असली तरी समोरील डॉक्टरने दिलेल्या चिठ्ठीवर विश्वास ठेवून रक्तद्रव द्यावा लागतो. परंतु त्या डॉक्टरने योग्य रुग्णाची निवड केली आहे, याची पडताळणी करणे शक्य नाही. मागणी मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्याने पालिकेतील साठा लगेचच संपू शकतो. राज्याच्या विशेष कृती दलाला प्रत्येक मागणीवर देखरेख करणे शक्य नाही. याचा वापर योग्य रुग्णांवर करणे आवश्यक आहे, ही बाब खासगी रुग्णालये आणि नातेवाईकांनी लक्षात घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या डॉक्टरांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:55 am

Web Title: plasma treatment is not beneficial in critically ill covid patients zws 70
Next Stories
1 पालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू
2 Coronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण
3 वैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित!
Just Now!
X