21 February 2019

News Flash

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून संशोधन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून संशोधन

पर्यावरणाला घातक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचा अभिनव प्रयोग मुंबईमध्ये यंदा राबविण्यात येणार आहे. बेकरीत वापरला जाणारा सोडा (अमोनिअम बायकाबरेनेट) आणि पाणी या मिश्रणात या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रभादेवी आणि वरळी येथे दोन कृत्रिम तलाव पालिकेकडून उभारले जाणार आहेत. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) संशोधन करून विकसित केलेला हा प्रयोग गेली तीन वर्षे पुण्यामध्ये राबविला जात असला तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये या वर्षी प्रथमच केला जाईल.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यामध्ये सहजासहजी विरघळत नसल्याने त्यांच्या विसर्जनाची समस्या गेली अनेक वर्षे भेडसावत आहे. आकर्षक  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळत असल्याने त्यांच्या विघटनासाठी पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन पुण्यातील कमिन्स इंडिया लिमिटेड आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा  पाच वर्षे यावर संशोधन करत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस हे कॅल्शियम सल्फेट असल्याने ते साध्या पाण्यात विरघळत नाही. गणेशमूर्तीचे विसर्जन लोकांच्या भावनांशी निगडित विषय असल्याने त्याच्या विघटनासाठी सर्वच पर्यायांचा शोध सुरू होता.  बेकरीमध्ये वापरात असलेला खाण्याचा सोडा आणि पाणी या मिश्रणात या मूर्तीचे योग्य रीतीने विघटन होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले असल्याचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ संशोधक डॉ. शुभांगी उंबरकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या संशोधनाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तपासणी करून मान्यता दिली. या वर्षी प्रथमच मुंबई महानगरपलिकेने आमचा हा प्रयोग राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही डॉ. उंबरकर यांनी सांगितले.

प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली आणि वरळी येथील जांबोरी मैदान येथे दोन कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. या तलावांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी जलाभिषेक म्हणजेच अमोनिअम बायकाबरेनेट आणि पाण्याचे मिश्रण तयार केले जाणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी गणपती विसर्जनासाठी येऊन पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी केले आहे.

प्रयोग असा.. बादलीमध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये बेकरीत वापरण्याचा सोडा आणि पाणी याचे मिश्रण तयार करून त्यामध्ये  मूर्तीचे विसर्जन करावे. या मिश्रणाला जलाभिषेक असे नाव देण्यात आले आहे. दर दोन ते तीन तासांनी हे मिश्रण ढवळावे. सर्वसाधारणपणे ४८ तासांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे विघटन होऊन बादलीमध्ये तळाला कॅल्शिअम काबरेनेटचा थर जमा होतो. बादलीत स्थिर झालेले पाणी अमोनिअम सल्फेट म्हणजेच उत्तम प्रतीचे खत असून त्याचा थेट झाडांसाठी वापर करता येतो.

First Published on September 14, 2018 12:16 am

Web Title: plaster of paris ganesh visarjan