प्लास्टिकविषयी निर्णायाला व्यापाऱ्यांचा विरोध

राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालतानाच पाण्याची बाटली आणि दुधाच्या पिशव्यांमागे अतिरिक्त कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याच्या प्रत्येक बाटलीमागे एक रुपया आणि दुधाच्या पिशवीमागे पन्नास पैसे असा कर ग्राहकांकडून यापुढे वसूल केला जाणार आहे. ग्राहकांकडून हा छुपा कर वसूल करण्याच्या निर्णयाला ग्राहक पंचायतीने पाठिंबा दिला असला तरी दुकानदार आणि फेरीवाल्यांनी या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटवला आहे.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत प्लास्टिकबंदीची घोषणा केली. सरसकट बंदीच्या निर्णयाची घोषणा करताना काही प्लास्टिकच्या वस्तूंना बंदीच्या निर्णयामधून वगळण्यात आले आहे. मात्र त्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावून तो ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुधासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. दुकानांमधून दुधाची पिशवी खरेदी करताना ५० पैसे आणि पाण्याची बाटलीची खरेदी करताना १ रुपयाचा अतिरिक्त कर ग्राहकांना दुकानदारांना द्यावा लागणार आहे. त्यानंतर दुधाची रिकामी पिशवी किंवा पाण्याची बाटली पुन्हा दुकानदारांना दिल्यास हे अतिरिक्त पैसे परत मिळणार आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसे खर्च होणार असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

ग्राहकांना पाण्याची बाटली आणि दुधाची पिशवी दिल्यानंतर पुन्हा तिचा परतावा होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. शिवाय कंपनीकडून या दोन्ही वस्तूंची खरेदी करताना अतिरिक्त कराचा भरणा करावा लागणार असल्याने आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दादर येथील दुकानदार श्याम जाधव यांनी सांगितले. तसेच प्लास्टिकचे आणि थर्माकोलचे कप, काटे-चमचे, ताट यांना बंदी आल्यामुळे त्यासाठीच्या पर्यायी वस्तूंची खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांकडून विकण्यात येणाऱ्या वस्तूंच्या किमतीतदेखील वाढ होणार असल्याची शक्यता फेरीवाला संघटनेतील एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मात्र सरकारच्या या निर्णयाचे ग्राहक पंचायतीने स्वागत केले आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची ठोस अंमलबजावणी होण्यासाठी अतिरिक्त कर लावल्यास ग्राहकांना प्लास्टिकबंदीचे महत्त्व समजेल. जेणेकरून प्लास्टिक इतरत्र टाकताना त्यासाठी मोजलेल्या अतिरिक्त कराची त्यांना जाणीव असेल. तसेच गेली दोन वर्षे ग्राहक पंचायत प्लास्टिकबंदीची मागणी करत असून समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे ग्राहक पंचायतीच्या अभियान प्रमुख वर्षां राऊत यांनी सांगितले.