राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही फेरीवाल्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. आता मुंबई महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून 1 फेब्रुवारीपासून याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून विशे। पथक नेमण्यात आलं आहे. हे पथक प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जाणार असून प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला जाणार आहे.

सरकारने 23 जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. असे असतानाही अनेक फेरीवाल्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्याकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास त्याला ‘ब्लॅक लिस्ट’ करून ‘फेरीवाला परवाना प्रक्रियेतून’ बाद करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. या निर्णयाची 1 फेब्रुवारीपासून कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये कारवाई केली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथक नेमण्यात आलं आहे. 23 जूनपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल 35 हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.