अक्षय मांडवकर

नद्यांच्या प्रदूषणातही वाढ; केंद्रीय संस्थांच्या अहवालांतील निष्कर्ष; महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना
Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

नाल्यासारखी दिसणारी मिठी नदी आणि प्लास्टिकने वेढलेला समुद्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रदूषित झाल्याचे केंद्रीय संस्थांनी केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील किनाऱ्यांवर देशभरातील अन्य किनाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्लास्टिक आढळले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या (सीपीसीबी) अहवालानुसार गेल्या वर्षी राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये २०१७ च्या तुलनेत वाढ होऊन मिठीच्या प्रदूषणाची सर्वसाधारण पातळी सुरक्षा मर्यादेपेक्षा २५ पट अधिक झाली आहे. तर ‘केंद्रीय समुद्री मत्सिकी संशोधन संस्थे’च्या (सीएमएफआरआय) अभ्यासात देशातील इतर किनारपट्टय़ांच्या तुलनेत मुंबईच्या समुद्राच्या पोटात सर्वाधिक प्लास्टिक आढळले आहे. शहरातील जलप्रवाहांमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात सोडले जाणारे प्रदूषित सांडपाणी आणि प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या प्लास्टिककडे मुंबई महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

प्रदूषित पाण्याबाबत ‘सीपीसीबी’ने आखून दिलेल्या मर्यादेनुसार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रामधून समुद्र आणि नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याची ‘बायोकॅमिकल ऑक्सिजन डिमांड’ (बीओडी) लीटरमागे १० एमजी असावी. पाण्यातील परिसंस्थेसाठी ६ एमजी बीओडी मर्यादेवरील आणि माणसांसाठी ३ एमजी मर्यादेवरील पाणी हानिकारक आहे. मात्र ‘सीपीसीबी’ने जाहीर केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी मिठी नदीच्या प्रदूषणाची सर्वसाधारण पातळी लीटरमागे २५० एमजी होती. ही पातळी प्रदूषणाच्या विहित मर्यादेपेक्षा २५ पट अधिक होती. २०१७ मध्ये राज्यातील नद्यांच्या प्रदूषित पट्टय़ांची संख्या ४९ होती. २०१८ मध्ये ती ५३ झाली. यामध्येही इतर नद्यांमधील बीओडीचा स्तर हा १० ते १०० एमजीदरम्यान होता. केवळ  मिठी नदीच्या बोओडीचा स्तर २५० असल्याने ती राज्यातील  प्रदूषित नदी असल्याचे केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आले.

मिठीच्या प्रवाहात श्रद्धानंद, लेलेवाडी, ओबेरॉय कृष्णनगर, जरमरी आणि वाकोला हे नाले येऊन मिळतात.

मिठीचे पात्र आणि नाल्यांलगत असणाऱ्या वस्ती आणि औद्योगिक संस्थांमधून मोठय़ा प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जाते. यांमुळे दिवसागणिक मिठीच्या प्रदूषणात भर पडत आहे. यावर उपाय म्हणून मिठीच्या पात्रालगत सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे आणि पात्रात सोडल्या जाणारे सांडपाणी या केंद्रात वळविण्याचे काम पालिकेकडून करण्यात येत आहे.

हे काम चार टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी गेल्या महिन्यात कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती, पालिकेच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

मिठीसारखीच परिस्थिती मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) दर महिन्याला मिठीसह मुंबईतील १२ समुद्र किनाऱ्यांची पाहणी करते. पावसाळ्यापूर्वी केलेल्या पाहणीत बारापैकी सात किनारे प्रदूषित असल्याचे आढळले. यामध्ये वर्सोवा, वरळी, नरीमन पॉइंट, मलबार हिल, हाजी अली आणि माहीम खाडी यांचा समावेश होता.

मात्र मुंबईच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाची पातळी बऱ्यापैकी नियंत्रणात आली असल्याचा दावा ‘एमपीसीबी’ने केला आहे. महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या वाढलेल्या क्षमतेमुळे प्रदूषित पाणी जलप्रवाहांमध्ये सोडण्यावर नियंत्रण मिळवता आल्याची माहिती एमपीसीबीचे सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के यांनी दिली.

१३१.८५ किलो प्लास्टिक

देशातील इतर किनारपटय़ांपैकी मुंबईच्या किनारपट्टीलगतच्या समुद्रात सर्वाधिक प्लास्टिक असल्याचे सीएमएफआरआयने केलेल्या अभ्यासात आढळले आहे. मुंबईतील समुद्रात प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात १३१.८५ किलो प्लास्टिक आढळून आले आहे.

कोचीमध्ये १.५५ किलो, विशाखापट्टण येथे ४.९५ आणि रत्नागिरीमध्ये ७३.१६ किलोच्या घरात आहे. मुंबईच्या सागरी परिक्षेत्रातील माशांच्या चाचणीत त्यांच्या पोटातून संशोधकांना प्लास्टिक सापडले आहे.

देशातील किनाऱ्यांच्या तुलनेत मुंबईच्या सागरी क्षेत्रात सर्वाधिक प्लास्टिक आढळले. कुपा, रावस, धोमा या माशांच्या पोटात प्लास्टिकचे कण सापडले आहेत. यावर प्रतिबंध म्हणून महापालिकेने नाल्यांच्या किंवा खाडीच्या मुखाशी जाळ्या बसविणे, एमपीसीबीएने प्रदूषित सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियमांची आखणी करणे गरजेचे आहे.

-के. वी. अखिलेश, शास्त्रज्ञ, सीएमएफआरआय.