मुंबईतीत टाटा स्मारक केंद्राच्या रुग्णालयात देशभरातून येणाऱ्या लाखो रुग्णांवर उपचार सुरू असतानाच त्यांना मानसिक, आर्थिक बळ देण्यासाठी अनेक लहान प्रकल्प या केंद्राच्या आवारात उभे राहिले आहेत, मोठे झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी ‘सेव्ह अ लाइफ’ हा प्लेटलेट दानाविषयी सुरू झालेल्या अशाच एका प्रकल्पाचा आवाका वाढवत त्याला शहरपातळीवर नेण्यात आले आहे. देशपातळीवरही हा प्रकल्प राबवता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डेंग्यूची अधूनमधून येणारी साथ आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी काही वेळा आवश्यक असलेल्या प्लेटलेट्समुळे रक्ताच्या या एका घटकाबद्दल चर्चा होऊ लागली आहे. रक्तदानाबाबत झालेल्या जनजागृतीनंतर याबाबत दशकभरापूर्वी असलेला तुटवडा भरून काढता आला. आता प्लेटलेट्सबाबतही त्याचप्रकारे दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. केमोथेरपीसारख्या उपचारांमध्ये प्लेटलेट्सची आत्यंतिक आवश्यकता असते. रक्तात दिल्या गेलेल्या प्लेटलेट्सचे आयुष्य सहा तासांचे असल्याने दर सहा तासांनी प्लेटलेट्स चढवाव्या लागतात. शरीर स्वत:हून प्लेटलेट्स बनवेपर्यंत हा पुरवठा सुरू ठेवावा लागतो, असे टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.
सेव्ह अ लाइफच्या नोंदणीअंतर्गत आतापर्यंत २२८० दात्यांची नोंद झाली असून ही नोंद पाच हजारावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. जीवनमरणाशी लढा देत असलेल्या रुग्णांसाठी ऐच्छिक दात्यांनी पुढे यायला हवे, असे नर्गिस दत्त स्मारक धर्मादाय संस्थेच्या विश्वस्त प्रिया दत्त म्हणाल्या. आपल्या देशात केवळ पाच टक्के दाते प्लेटलेट्सचे दान करतात. रक्तदात्यांबाबत जागरूकता असली तरी प्लेटलेट दानाविषयी अजूनही अनेक गैरसमज आहेत. या दानामुळे शरीरावर यत्किंचितही परिणाम होत नाही. शरीर ही कमतरता भरून काढते. असे संक्रमण औषध विभागाचे प्रमुख डॉ. सुनील राजाध्यक्ष यांनी सांगितले.
प्लेटलेट्स मिळवण्यासाठी शहराबाहेरून आलेल्या रुग्णांच्या आप्तस्वकीयांना बरीच धावपळ करावी लागते. सहा दाते मिळवणे हे कठीण काम होते. आधीच राहण्याचा, जेवण्याचा, उपचारांच्या खर्चाने कोलमडलेले नातेवाईक यामुळे आणखी त्रस्त होतात व काही वेळा उपचार मध्येच सोडून निघून जातात. २००९ मध्ये लहान मुलांच्या विभागातील २० टक्के रुग्ण या पद्धतीने उपचाराविना गेले होते. सामाजिक संस्था तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे प्रमाण आता पाच टक्क्यांपर्यंत खाली आणले गेले आहे, अशी माहिती बाल कर्करोग विभागातील सामाजिक कार्यकर्त्यां शालिनी जाटिया यांनी दिली.

प्लेटलेट्सविषयी..
प्लेटलेट्समुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन रक्तस्राव थांबण्यास मदत होते. एखाद्या रक्तदात्याकडून मिळालेल्या एक युनिट रक्ताचे विघटन केल्यास त्यातील एक अष्टमांश भाग हा प्लेटलेट्स असतो.
रक्ताचे एक युनिट पाच ते सहा आठवडे साठवता येते, प्लेटलेट्स साठवण कालावधी मात्र पाच ते सहा दिवसच असतो.
प्लेटलेट्सचे एक युनिट तयार करण्यासाठी सहा ते आठ रक्तदात्यांकडून मिळालेल्या रक्तातील प्लेटलेट्स गोळा कराव्या लागतात. याला रॅण्डम डोनर प्लेटलेट्स (आरडीपी) म्हणतात.
एकाच रक्तदात्याकडून आलेल्या प्लेटलेट्सला सिंगल डोनर प्लेटलेट्स (एसडीपी) म्हणतात. एसडीपी हा तुलनेने चांगला प्रकार समजला जातो.  रक्तदात्याकडून पूर्ण रक्त न घेता त्याच्या रक्तातून प्लेटलेट्स काढून उर्वरित रक्त पुन्हा शरीरात सोडले जाते.

मागणी आणि पुरवठा
देशात वर्षभरात साधारण १ कोटी १२ लाख युनिट रक्ताची गरज लागते. त्यापैकी सुमारे १ कोटी युनिट रक्त गोळा होते.
वर्षभरात देशात ७० हजार सिंगल डोनर प्लेटलेट्सची गरज आहे. उर्वरित प्लेटलेट्सची गरज विविध रक्त युनिटच्या विघटनातून पुरवली जाते.
एकटय़ा टाटा रुग्णालयात रोज २०० आरडीपी आणि २० एसडीपी लागतात.

प्लेटलेट दाते होण्यासाठी..
shalinijatia@hotmail.com किंवा ९८६९१२२२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. काही सोप्या चाचण्यांनंतर नोंद केली जाईल. रुग्णालयाला गरज पडल्यास तुम्हाला फोन करून बोलावले जाईल.

केमोथेरपीसारख्या उपचारांमध्ये प्लेटलेट्सची आत्यंतिक आवश्यकता असते. त्यामुळे प्लेटलेट्सच्या दात्यांनीही पुढे येण्याची गरज आहे.
डॉ. राजेंद्र बडवे, संचालक, टाटा स्मारक केंद्र
प्लेटलेट दानाविषयी अजूनही अनेक गैरसमज आहेत. या दानामुळे शरीरावर यत्किंचितही परिणाम होत नाही. शरीर ही कमतरता भरून काढते.
डॉ. सुनील राजाध्यक्ष,संक्रमण औषध विभागाचे प्रमुख