News Flash

 ‘कालिना मिनी मॅरेथॉन’मध्ये सहभागी खेळाडूंची फसवणूक!

प्रत्यक्षात शर्यत पूर्ण झाल्यानंतर विजेत्या खेळाडूंच्या हातात एकही दमडी देण्यात आली नाही.

लाखोंची बक्षिसे जाहीर करून प्रत्यक्षात एकही पैसा दिला नाही

‘कालिना मिनी मॅरेथॉन’ नावाने ‘एअर इंडिया’च्या मैदानात पार पडलेल्या शर्यतीसाठी देशभरातून आलेल्या खेळाडूंना हात हलवत घरी परतण्याची वेळ आली आहे. या मॅरेथॉन शर्यतीतील विजेत्याला लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात शर्यत पूर्ण झाल्यानंतर विजेत्या खेळाडूंच्या हातात एकही दमडी देण्यात आली नाही. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, आयोजकांनी केलेल्या घोषणेबद्दल आपल्याला काही माहिती नसून या कार्यक्रमाचा भाजपशी काही संबंध नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केल्यानंतर आमची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षाच होणार नाही का?, असा सवाल मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी केला आहे.

‘नन्ही गुंज विकास फाऊंडेशन’ नामक संस्थेच्या वतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी ‘कालिना मिनी मॅरेथॉन’ शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पाच आणि दहा किलोमीटर अशा दोन विभागात झालेल्या या शर्यतीतील पहिल्या तीन विजेत्यांना एक लाख रुपये, ७५ हजार रुपये आणि ५० हजार रुपये रोख देण्यात येतील. तसेच, उत्तेजनपर पारितोषिके म्हणून ‘गिफ्ट व्हाऊचर्स’ देण्यात येतील अशी जाहिरात संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आली होती. पारितोषिकांची रक्कम पाहून देशभरातील राष्ट्रीय स्तरावरचे धावपटू या ‘कालिना मिनी मॅरेथॉन’मध्ये सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजता शर्यत संपल्यानंतर पारितोषिके देण्याच्या वेळी मात्र, आयोजकांनी खेळाडूंच्या हातात १७ आणि १८ हजार रुपये टेकवले. स्पर्धकांनी पुरस्काराच्या मूळ रकमेबाबत विचारणा केली असता आयोजकांनी घुमजाव केले, अशी माहिती या स्पर्धेत आपले खेळाडू घेऊन आलेले प्रशिक्षक समाधान लभडे यांनी दिली. आशीष शेलार या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, शेलार यांच्याकडे खेळाडूंनी फसवणुकीची तक्रार नेल्यानंतर आयोजकांशी आपला काहीही संबंध नाही. तुम्ही याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करा, असे सांगत त्यांनी हात झटकले. खेळाडूंनी वाकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रकरण आपल्या हद्दीत नसल्याचे सांगून पोलिसांनीही तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचे समाधान यांनी सांगितले.

कालिना येथील मॅरेथॉन स्पर्धेशी भाजपचा संबंध नाही. ‘नन्ही गुंज फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून उपस्थित होतो. आयोजकांनी जाहीर केल्याप्रमाणे बक्षिसाची रक्कम दिली नसेल तर ते चुकीचे आहे. याप्रकरणी खेळाडूंची तक्रार नोंदवून घेऊन चौकशी करा, अशी विनंती मी स्वत: पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांना केली आहे. मात्र, या प्रकरणाचा भाजपशी संबंध जोडू नये.

-आ. आशीष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 1:01 am

Web Title: players cheated participate in kalina mini marathon
Next Stories
1 राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये ओस
2 तंत्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा वाढल्या
3 दुष्काळनिधीसाठी कर ही अर्थमंत्र्यांची ‘पाकिटमारी’- शिवसेना
Just Now!
X