साहित्याच्या ‘नोबेल पारितोषिका’चे मानकरी; कलाकृतींचा अनेक भारतीय भाषांत अनुवाद 

साहित्याच्या ‘नोबेल पारितोषिका’चे १९९७ सालचे मानकरी नाटय़लेखक व अभिनेते दारिओ फो यांचे मिलान येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. इटालियन भाषेत फो यांनी लिहिलेल्या नाटकांचे अनुवाद व प्रयोग इंग्रजीसह मराठी, बंगाली, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम् आदी भारतीय भाषांतूनही झाले आहेत.

महाराष्ट्रातील शरद भुथाडिया, अतुल पेठे, विपुल महागावकर अशा अनेक नाटय़कर्मीना प्रेरणा देणाऱ्या फो यांची कारकीर्द १९५० च्या दशकात झाली आणि ८० हून अधिक नाटकांचे लेखन केले. राजकीय व्यंगात्मक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या फो यांनी केवळ रंगकर्मी वा नाटय़लेखकांपुढेच नव्हे, तर सरकार आणि प्रचलित जनमताच्या रेटय़ाविरुद्ध विचार मांडणाऱ्या अनेकांपुढे एक आदर्श ठेवला. व्हॅटिकनच्या चर्चने त्यांची निंदा केली होती, इटालियन चित्रवाणी वाहिन्यांनी त्यांच्यावर बराच काळ अघोषित बंदीच घातली होती आणि तरीही जागतिक कीर्तीचे इटालियन नाटककार ही त्यांची ओळख अढळ होती. त्यांच्या निधनानंतर, इटलीचे पंतप्रधान मॅटिओ रेंझी यांनीही अखेर शोकसंदेश पाठवल्याचे वृत्त ‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने दिले आहे.

पत्नी फ्रांका रामे यांच्यासह दारिओ फो यांनी अनेक नाटय़प्रयोग केले. हे प्रयोग अनेकदा इतके सुटसुटीत असत की, मिलानच्या एका चौकातून त्यांचे राजकीय प्रहसन पोलिसांनी बंद पाडले तेव्हा जवळच्याच खासगी इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी हाच प्रयोग सुरू ठेवला आणि प्रेक्षकांनी चौकातूनच तो पाहिला! त्यांच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अ‍ॅन अ‍ॅनार्किस्ट’ या नाटकाचे दोन अनुवाद (‘एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू’- माया पंडित; ‘खिडकी’ : विपुल माणगावकर) जवळपास १५ वर्षांच्या फरकाने रंगभूमीवर आले. माया पंडित यांनीच ‘वेकिंग अप’ या स्त्री-एकपात्री नाटकाचाही अनुवाद ‘जाग’ या नावाने केला आहे. भारतीय भाषांत ‘अ‍ॅनार्किस्ट’चे सर्वाधिक अनुवाद झाले, त्यापैकी गुजराती ‘एन्काऊंटर’ला राज्य पुरस्कारही मिळाला होता. ‘फो यांची नाटके ही कथावस्तूपेक्षा प्रयोगावरच अधिक भर देणारी आहेत,’ अशी टीका समीक्षक करीत असत. पण नेमक्या याच वैशिष्टय़ामुळे, प्रत्येक भाषेतले कलावंत दारिओ फो यांच्या आशयाशी आपापल्या परिस्थितीतून नाते सांगणारे नाटक उभारू शकले. सन २०१३ च्या ‘आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिनी’ त्यांचा संदेश प्रत्येक भारतीय भाषेतून अनुवादित झाला. ‘हुकूमशहांना लेखकांपेक्षा रंगकर्मीपासून अधिक धोका असतो, म्हणून नाटकांवर हल्ले होतात,’ असे फो यांनी त्यात म्हटले होते.

फो यांचा मृत्यू श्वसनविकाराने गुरुवारी झाला, असे वृत्त ‘गार्डियन’ने दिले आहे.