गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे लीलावती रूग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारपूस केली. मुंबईतील नियोजीत कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदींनी रूग्णालयात जाऊन पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी समाज माध्यमांत येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन लीलावती रूग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याने पर्रिकरांना दि. १५ रोजी मुंबईतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पर्रिकरांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट वृत्तांना पेव फुटले होते. अखेर लीलावती रूग्णालयानेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले.

दरम्यान, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेसाठी पंतप्रधान मोदी हे रविवारी मुंबईत आले होते. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास मोदींनी लीलावती रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पर्रिकर हे मोदी यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी होते. त्यांनी संरक्षणमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती.

पर्रिकर यांच्या प्रकृतीविषयी येत असलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे लीलावती रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. पर्रिकर यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असेही रुग्णालयाने स्पष्ट केले.