छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या आरबी समुद्रातील स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात केलेल्या मुंबई दौऱ्याच्या जाहिरातबाजीवर सरकारने तब्बल आठ कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हा निधी चक्क आकस्मित निधीतून खर्च करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात ११ हजार कोटी रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात कृषी पंपधारक शेतकरी, यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलतींबरोबरच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या जाहिरातीवरही मोठय़ाप्रमाणात खर्च करण्यात आल्याचे या पुरवणी मागण्यांतून समोर आले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाने पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचे आयोजन केले होते. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जलपूजन, मुंबई मेट्रो मार्ग, शिवडी-नाव्हा-शेवा पारपंदर प्रकल्पाचे भूमिपूजन एमयूटीपी अंतर्गत नवीन रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी आकस्मितता निधीतून आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे पुरवणी मागण्यांमधून समोर आले आहे.

यंत्रमागधारक, कृषी-पंपधारकांना दिलेल्या विविध सवलतींपोटीचा खर्च भागविण्यासाठी दोन हजार ८०८ कोटी रुपये, उज्ज्वल डिस्काम योजनेंतर्गत रोख्यांच्या माध्यमातून उभारलेल्या कर्जाचा पहिला हप्ता फेडण्यासाठी ९९१ कोटी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या भाडे सवलतीपोटी एक हजार कोटी रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.