दूरचित्रवाणी संवादाद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची येथील आदिवासींची संधी शुक्रवारी थोडक्यात हुकली. पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधलेल्या लाभार्थी महिलांना गृहप्रवेश म्हणून प्रातिनिधिक किल्ल्या देण्याचा हा कार्यक्रम होता. त्या वेळी मोदी यांच्यासोबत लाभार्थीचा संवाद होणार होता.

जिल्हा परिषदेने यासाठी पालघर तालुक्यातील गांजे-ढेकाळे गावातील लाभार्थी निवडून तयारी केली होती. पण वेळ अपुरी पडल्याने आदिवासी महिलांचा हिरमोड झाला. व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू झाली आणि पंतप्रधानांनी लाभार्थीशी थेट संवाद सुरू केला. त्यांनी नंदूरबार, अमरावती, सोलापूर, नागपूर, ठाणे, सातारा आणि लातूर येथील लाभार्थ्यांशी चर्चा सुरू केली. हे पाहून उत्कंठा लागलेल्या पालघरमधील लाभार्थीना ही संधीच मिळाली नाही. कॉन्फरन्सची वेळ संपली.