सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकांवर कारवाईची मागणी

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर तत्काळ कारवाई करून या बँकेतील संचालक आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र आर्थिक अनियमिततेमुळे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने लादलेल्या र्निबधांना दीड वर्ष लोटल्यानंतर अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे बँकेच्या खातेदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

खातेदारांनी रविवारी रात्री थेट शिवसेना भवन, मातोश्री, मंत्रालय, शिवालय, चर्चगेट, सिटी बँक मुख्यालयाबाहेर बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे फलक झळकवून रोष व्यक्त केला आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या प्रकारामुळे बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये असंतोष धगधगू लागला आहे. बँकेचे संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर बँकेबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. केवळ विलीनीकरण होणार असे वारंवार सांगितले जाते. मात्र या बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण होण्याचे चिन्हे दिसत नाही. त्यामुळे अखेर बँकेच्या काही खातेदारांनी मंत्रालय, मातोश्री, शिवसेना भवन, शिवालय, चर्चगेट, सिटी बँक मुख्यालयाच्या आसपास रविवारी निषेधाचे फलक झळकवून रोष व्यक्त केला.

पीएमसी बँकेच्या संचालकांवर आणि अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईप्रमाणे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना अटक करून त्यांची ईडीमार्फत चौकशी करणार का? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्तता करून सामान्य खातेदारांचे पैसे मिळवून देणार का? सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्याने त्या धक्क्य़ामुळे आतापर्यंत ११ खातेदारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का? असे सवाल फलकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक अनियमिततेमुळे दीड वर्षांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेवर नर्ि्बध लादले होते. परिणामी, आयुष्यभराच्या ठेवी बँकेत जमा केलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळविण्यात अडचणी येत आहेत. मागील दीड वर्षांपासून हे खातेदार त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत, तसेच आंदोलनेही केली. मात्र अद्यापही मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार आक्रमक झाले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर फलक झळकवून आपल्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

खातेदारांनी रविवारी रात्री ठिकठिकाणी फलक लावले. मात्र त्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी संबंधित ठिकाणी जाऊन हे फलक उतरविले. मात्र हे फलक काढले असले तरी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार खातेदारांनी केला आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडे हा प्रस्ताव दोन दिवसात सादर केला जाणार आहे. मात्र काही लोक याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

– आनंदराव अडसूळ, अध्यक्ष, सिटी को-ऑपरेटिव्ह बँक