PMC बँकेत झालेल्या घोटाळ्यानंतर ठेवीदार हवालदिल झाले आहेत. घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही ठेवीदारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, मुंबईतील मुलूंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं बँकेत ठेवलेले पैसे बुडाल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही महिला डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा महिलेच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्यानंतर तिने आत्महत्या केली, असं महिलेच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

१ जुलै रोजी मुलुंड भागात ही घटना घडली. यासंदर्भात ‘मुंबई मिरर’नं वृत्त दिलं आहे. रचना सेठ असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. ४५ वर्षीय रचना सेठ यांनी १ जुलै रोजी सकाळी वाजताच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी सदरील महिलेचा पती कामावर गेलेला होता. तर मुलगी किराणा दुकानात सामना आणण्यासाठी गेली होती. घरात कुणीच नसताना महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.

“पीएमसी बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर ती प्रचंड तणावाखाली जगत होती. विशेषतः गेल्या महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली. त्यानंतर तिची परिस्थिती आणखी बिघडली होती,” असं रचना शेठ यांचे पती विशाल सेठ यांनी सांगितलं. विशाल सेठ एका प्रसिद्ध भोजनालयात मॅनेजर म्हणून कामाला आहेत.

“पीएमसी बँकेतील पैसे बुडाल्यामुळे कुटुंबाचं आर्थिक नुकसान झाल्याच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून रचना मध्यरात्री उठायची व रडायची. मागील काही आठवड्यांपासून ती सोबत ओढणी ठेवायची. त्यामुळे आम्ही नेहमी चिंतेत असायचो की तिने असं काही टोकाचं पाऊल उचलू नये,” विशाल सेठ म्हणाले. विशाल सेठ यांचे पीएमसी बँकेत १५ लाखांपेक्षा पैसे जमा केलेले होते.

“ही बँक निवडली ही चूकच झाली म्हणून या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे ती नेहमी स्वतःला दोष द्यायची. आम्ही मागील काही महिन्यांपासून एका मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन घेऊन जात होतो,” असंही विशाल सेठ यांनी सांगितलं.

“पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची बातमी ऐकल्यानंतर आईला धक्काच बसला. इतर ठेवीदार त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपले पैसे परत मिळतील, असं सांगून आम्हीही तिला धीर द्यायचो. पण दिवाळीनंतर परिस्थिती खराब झाली. माझे वडील कामावर असतात. आई, घाबरायला लागली की, मी अनेकदा कॉलेज सोडून धावत घरी यायचे. पैसे कधी परत मिळतील यासाठी ती मांत्रिक व पुजारी यांनाही विचारणा करायची,” असं रचना सेठ यांची मुलगी कशीश हिनं सांगितलं. कशीश सध्या बी.कॉमच्या अंतिम वर्षात शिक्षण घेते.