पीएमसी बँक गैरव्यवहार

मुंबई : ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.’ला (एचडीआयएल) देण्यात आलेल्या कर्जापोटी ‘पंजाब अँड महाराष्ट्र बँके’कडे गहाण ठेवलेल्या ४० मालमत्तांचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. त्यांचा लिलाव करून त्यातून मिळणाऱ्या रकमेतून कर्जाची रक्कम वळती करून घेण्याचा प्रस्ताव ‘एचडीआयएल’ने दिला असला तरी या प्रकरणी चौकशी करणाऱ्या सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) मात्र या सर्व मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

‘एचडीआयएल’ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि संचालक सारंग वाधवान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या कोठडीत आहेत. या प्रकरणी ‘ईडी’नेही काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर पंजाब अँड महाराष्ट्र बँकेने तारण घेऊनच कर्ज दिले आहे. तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव झाल्यास कर्ज तसेच व्याजाची रक्कम बँकेला परत मिळू शकेल, असे एचडीआयएल कंपनीने कळविले आहे. मात्र आता सक्तवसुली ‘ईडी’नेही चौकशी सुरू केल्यामुळे या सर्व प्रक्रियेला खीळ बसली आहे.

‘एचडीआयएल’ने एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीवर बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. या कंपनीकडून पुढील आठवडय़ात अहवाल येण्याची शक्यता आहे. ‘एचडीआयएल’ला बँकेने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज ही रक्कम ४५०० कोटींच्या घरात असल्याचा दावाही कंपनी करत आहे. वसई, ठाणे, नवी मुंबई आणि केरळ आदी ठिकाणी असलेल्या या मालमत्ता २०१० मध्ये गहाण ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात बँकेने २२०० कोटींचे कर्ज दिले होते. त्यावरील थकलेल्या व्याजामुळे ही रक्कम ४५०० कोटींच्या घरात गेल्याचा दावाही करण्यात आला आहे.

मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू :

वाधवान कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया ‘ईडी’ने सुरू केली आहे. आतापर्यंत ३२८० कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. बँकांकडे गहाण असलेल्या मालमत्तांबाबत ‘ईडी’नेही माहिती मागविली आहे. या मालमत्ताही ताब्यात घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.