कट रचून पद्धतशीरपणे घोटाळा, पुरावे नष्ट केल्याचा आरोप

मुंबई : स्वत:च्या पदरी कोटय़वधींची माया पाडून घेण्यासाठी पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी पदाधिकारी आणि एचडीआयएल समूहाच्या प्रमुखांनी कट रचून, पद्धतशीरपणे हजारो कोटींचा घोटाळा केला. हा घोटाळा रिझव्‍‌र्ह बँकेपासून दडविण्यासाठी पुरावे नष्ट केले, असे आरोप आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी न्यायालयात केले.

आर्थिक गुन्हे शाखेने बँकचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वरियम सिंग, माजी संचालक सुरजित सिंग अरोरा, एचडीआयएल समूहाचे प्रमुख राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरोधात शुक्रवारी ३३ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. एचडीआयएल समूह कंपन्यांना अवैधरीत्या कर्ज वाटप करण्यासाठी मिळालेला मोबदला, या मोबदल्यातून पदाधिकाऱ्यांनी विकत घेतलेली मालमत्त्ता किंवा सुरू केलेल्या व्यवसायांची माहिती आरोपपत्रात नमूद आहे. आतापर्यंतच्या तपासातून घोटाळ्याची रक्कम चार हजार ७०० कोटी रुपये इतकी नमूद करण्यात आली असून ती पुढील तपासात वाढू शकेल, अशी शक्यता आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्रात वर्तवली आहे. पाच आरोपींव्यतिरिक्त अटकेत असलेल्या सातजणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. तो पूर्ण होताच अंतिम तपास अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल. सद्य:स्थितीत पाच आरोपींचा घोटाळ्यातील सहभाग, सहभाग सिद्ध करणारे पुरावे व संबंधीत तपशील नमूद केले आहेत, असे आर्थिक गुन्हे विभागाचे सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी स्पष्ट केले.

आरोपपत्रात कट रचून फसवणूक, बनावट कागदपत्रांसह बनावट बँक खाती तयार करणे, फौजदारी विश्वासघात व पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये आरोपींविरोधात खटला चालविण्याची परवानगी आर्थिक गुन्हे विभाागने मागितली. आरोपपत्रात ३४० साक्षीदारांचे जबाब समाविष्ट आहेत. साक्षीदारांमध्ये बँकेतील १० अधिकारी-कर्मचारी, ९० खातेदारांचा समावेश आहे. यापैकी चार प्रमुख साक्षीदारांचा जबाब फौजदारी दंड संहितेतील १६४ कलमान्वये दंडाधिकाऱ्यांनी नोंदवला आहे.