पंजाब-महाराष्ट्र बँकेच्या दोन माजी संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली. परमीत सोधी आणि सुरजितसिंह नारंग अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी अटकेत असलेल्या सुरजितसिंह अरोरा यांनी आजारपणाचे निमित्त करत जामीन अर्ज केला असून त्याची सुनावणी न्यायालयाने १६ नोव्हेंबपर्यंत तहकूब केली.
अरोरा यांना जामीन देऊ नका, या मागणीसाठी पीएमसी बँकेचे खातेदार मोठय़ा संख्येने सोमवारी सकाळी आझाद मैदानजवळील दंडाधिकारी न्यायालयात जमले होते. मात्र, सुनावणी जेवणाच्या सुटीनंतर ठेवण्यात आल्याने खातेदारांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा नोंदवून आजवर करण्यात आलेले अटकसत्र, कारवाईबाबत बर्वे यांनी खातेदारांना माहिती दिली. तसेच दाखल गुन्ह्य़ाचा पारदर्शक तपास करून गैरव्यवहारात सामील असलेल्या प्रत्येकाविरोधात कारवाई केली जाईल, अशा शब्दांत बर्वे यांनी खातेदारांना आश्वस्त केले.
दरम्यान, पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी दोन लेखापरीक्षकांना पोलिसांनी सोमवारी अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 1:56 am