कोरेगाव-भीमा प्रकरणात पंतप्रधान कार्यालय हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभाजी भिडे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कारवाईचे आश्वासन दिले होते. पण नंतर पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्याचे त्यांनी म्हटले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, संभाजी भिडेंना अटक करू नका अशा आशयाचा संदेश पंतप्रधान कार्यालयातून पाठवण्यात आल्याचा संदेश सगळीकडे फिरतोय. एकतर असे संदेश पाठवणे चुकीचे आहे, असे मी समजतो. कायदा हा सर्वांना समान आहे. ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांना अटक झालीच पाहिजे. भिडे यांच्यावरील एफआयआर फाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी कोरेगाव-भीमा प्रकरणातील दुसरे आरोपी मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारास संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे जबाबदार असून, दोघांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, सरकार या दोघांना पाठीशी घालत आहे. त्यांना अटक करावी, अन्यथा पुन्हा हिंसाचार उफाळून परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा आंबेडकर यांनी दिला होता.