मोबाइलची सर्वाधिक गरज ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये असते. पण त्याच वेळेस जर मोबाइलची रेंज नसेल तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचे उदाहरण म्हणजे अनेकदा रुग्णालयांमध्ये मोबाइल रेंज नसते, यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना परिजनांशी संपर्क साधणे अवघड होते. ही अडचण लक्षात घेऊन दस्तुरखुद्द पंतप्रधान कार्यालयानेच रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाची मोबाइल रेंज उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी अशी सूचना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाला केली आहे.
डिजिटल भारताचे स्वप्न उराशी बाळगून काम करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तंत्रज्ञानातील अशा त्रुटी स्वप्न साकारण्यास अडसर ठरू शकतात. यामुळेच रुग्णालयातील मोबाइल रेंजबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आणि त्यावर कार्यवाही करण्याची सूचना केली. पंतप्रधान कार्यालयाने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, बहुतांश रुग्णालयांमध्ये विशेषत: दिल्लीतील रुग्णालयांमध्ये मोबाइलची रेंज कमी येत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे याबाबत संबंधित मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांना सूचना करून योग्य ती कार्यवाही करावी. पंतप्रधान कार्यालयाच्या या पत्रावर दूरसंचार विभागाने देशातील महत्त्वाच्या नऊ मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांना एक पत्र लिहून संबंधित परिस्थितीची ओळख करून दिली व त्यानुसार कार्यवाही करण्यास सांगितली. दूरसंचार विभागाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विभागाच्या अभ्यासात दिल्लीतील बहुतांश रुग्णालयांच्या बाहेरील भागांत मोबाइलचे नेटवर्क चांगले मिळते. मात्र आतील भागांत नेटवर्क सुविधा फारशी चांगली मिळत नाही, असे निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना काही महत्त्वाचे निरोप देण्यासाठी वा इतर कारणांसाठी कराव्या लागणाऱ्या संवादात अडथळे निर्माण होतात. अशीच परिस्थिती अन्य ठिकाणीही असू शकते. यामुळे ही सेवा सुधारण्यासाठी रुग्णालयातील आतील बांधकामाला कोणतीही इजा न पोहोचवता उपलब्ध यंत्रणा बसवावी. जर या कामात रुग्णालयांतर्फे जर काही अडचणी आल्या तर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही पत्रात केले आहे.
दूरसंचार विभागाने सध्या हा प्रकल्प दिल्लीपुरता मर्यादित ठेवला असला तरी लवकरच तो इतरत्र राबविला जाण्याची शक्यता आहे. डिजिटल भारत मोहिमेत घोषणा करण्यात आलेल्या ई-आरोग्य सेवेसाठी सामान्यांकडे मोबाइल असणे आणि मोबाइलला रेंज असणे ही प्राथमिक गरज असणार आहे. ही गरज लक्षात घेऊन ही कार्यवाही सुरू करण्यात आल्याची चर्चाही दूरसंचार वर्तुळात होत आहे.