पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाचा निर्णय

मुंबई : पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदी याला मुंबईतील विशेष न्यायालयाने गुरुवारी फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. मद्यसम्राट विजय मल्यानंतर मोदी हा दुसरा व्यावसायिक नव्या फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी याच्या देशातील आणि देशाबाहेरील मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) मागणी मान्य करीत नीरव मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले. २०१८ मध्ये करण्यात आलेल्या नव्या फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार १०० कोटी वा त्याहून अधिकच्या आर्थिक घोटाळ्यातील एखाद्या आरोपीविरोधात वॉरंट बजावण्यात आले असेल आणि तो देश सोडून गेला असून परतण्यासही तयार नसेल तर अशा आरोपीला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची तरतूद आहे.

देश सोडून जातेवेळी नीरव मोदीला पैसे देण्याच्या तारखांबाबत पूर्ण जाणीव होती. शिवाय संशयितरीत्या आणि फौजदारी कारवाई होईल या भीतीने मोदी याने देश सोडला, असेही न्यायालयाने त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करताना नमूद केले आहे.

दरम्यान, याच प्रकरणात नीरव मोदी याच्यासह दोन आरोपींनी १५ जानेवारीपर्यंत न्यायालयासमोर हजर राहावे अन्यथा त्यांना फरारी गुन्हेगार घोषित केले जाईल, असा इशारा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी दिला होता.

देश-विदेशातील मालमत्ता जप्तीचा मार्ग मोकळा

* न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोदी याच्या मालकीच्या देशातील आणि परदेशातील मालमत्ता जप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय लंडनमध्ये प्रलंबित असलेल्या त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवरही त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

* नव्या कायद्यानुसार मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीसाठी ‘ईडी’च्या वतीने अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांच्यातर्फे अर्ज करण्यात आला होता. मात्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गोळा केलेला पुरावा आणि जबाब यांच्या आधारे मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी केली जात असून ती बेकायदा असल्याचा दावा करत मोदी याच्या वकिलाने ‘ईडी’च्या मागणीला विरोध केला होता.