News Flash

‘दासबोध’, विंदा-कुसुमाग्रजांच्या कविता रसिकांशी ‘बोलणार’!

राज्य मराठी विकास संस्थेने काही ‘बोलकी पुस्तके’ तयार केली असून संस्थेच्या http://rmvs.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर ती ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात

| February 25, 2013 02:49 am

राज्य मराठी विकास संस्थेने काही ‘बोलकी पुस्तके’ तयार केली असून संस्थेच्या http://rmvs.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर ती ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात ती विनामूल्य डाऊनलोडही करता येणार आहेत. संस्थेतर्फे सध्या जी ‘बोलकी पुस्तके’ तयार करण्यात आली आहेत त्यात समर्थ रामदास स्वामींचा ‘दासबोध’, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांच्या काही कविता आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्राचा समावेश आहे.
रामदासांच्या ‘दासबोध’ या ग्रंथातील २० दशके प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात ऐकता येतात. याचे संगीत राहुल रानडे यांचे आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमत्तिाने त्यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र जडणघडण, वैचारिक आंदोलन आणि निवड अशा तीन भागात ऐकता येते. सचिन खेडेकर, किरण यज्ञोपवीत यांनी या पुस्तकाचे वाचन केले आहे.
कुसुमाग्रज यांचे दोन कविता संग्रह येथे असून ‘प्रवासी पक्षी’ या शीर्षकांतर्गत ‘बोलक्या पुस्तका’त ६२ तर ‘रसयात्रा’ मध्ये ८० कविता आहेत. पृथ्वीचे प्रेमगीत, क्रांतीचा जयजयकार, कणा यासह कुसुमाग्रज यांच्या अनेक कवितांचा यात समावेश आहे.
विंदा करंदीकर ‘रक्त समाधी ते गझल उपदेशाचा’ आणि ‘लाज ते पिशी मावशीचे गाणे’ या शीर्षकाची दोन ‘बोलकी पुस्तके’ असून यात अनुक्रमे ५२ आणि १०७ कवितांचा समावेश आहे. डॉ. श्रीराम लागू, सुलभा देशपांडे, चंद्रकांत काळे, डॉ. गिरीश ओक, सुबोध भावे, सचिन खेडेकर, किशोर कदम आदींच्या आवाजात या कविता ऐकता येतात.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी बोलक्या पुस्तकांच्या या उपक्रमाचे अनौपचारिक प्रकाशन केले जाणार आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘बोलकी पुस्तके’ तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी वेणुताई चव्हाण विश्वस्त निधी, विंदांचे सुपत्र उदय करंदीकर, कॉण्टिनेंटल प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन यांचेही विशेष सहकार्य मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:49 am

Web Title: poem of dasbodh vinda kusumagraj will talk with appreciator
Next Stories
1 विधी विद्यापीठावरून मंत्रिमंडळात खडांजगी
2 खुल्या बाजारातील विजेचा उन्हाळ्यात राज्याला आधार
3 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी हिशेबात चुका
Just Now!
X