ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे अवघे जीवन शेती आणि निसर्गाच्या हिरव्या बोलीचा शब्द झाले आहे. आपल्या कवितांमधून त्यांनी नेहमीच निसर्ग, शेती आणि रानावनाच्या व्यथा, वेदना आणि आनंद व्यक्त केला. कवितेतून तरल जाणीव आणि संवेदना व्यक्त करणाऱ्या या निसर्ग कवीने आता शेतीची आत्मकथा लिहिली आहे. शेतीच्या आत्मकथनाचे लेखन नुकतेच पूर्ण झाले आहे.
या आत्मकथनासंदर्भात महानोर म्हणाले की, या शेतीने मला भरभरून दिले असून मी आज जो काही आहे, तो या शेतीमुळेच आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांकडून शेतीची केली जाणारी विक्री, शहरीकरणात जाणारी शेतजमीन, धनाढय़ांकडून शेतकऱ्यांची जमीन विकत घेऊन ती पडीक राहणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव न मिळणे आदी अनेक गोष्टी मला अस्वस्थ करतात. मी १७ व्या वर्षी शेती करायला लागलो. चार दुष्काळ पाहिले, विपन्नावस्थेत राहिलो पण खचलो नाही. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊन आत्महत्या करू नका, हेच मला शेतकऱ्यांना सांगायचे आहे.
या पुस्तकात विधान परिषदेतील या विषयावरील माझी भाषणे, पहिल्या जलसाहित्य संमेलनातील माझे अध्यक्षीय भाषण यासह पाणलोट क्षेत्र, पाझर तलाव आणि अन्य अशी एकूण ५६ छायाचित्रेही या पुस्तकात आहेत. हे पुस्तक नवनीत प्रकाशन प्रकाशित करत असल्याची माहितीही महानोर यांनी दिली.