संदीप आचार्य 
मुंबई: एकीकडे असह्य दातदुखी आणि दुसरीकडे दवाखान्यात विचित्र पोषाखातील डॉक्टरांना बघून पाच वर्षाच्या सुजाताने भोकाडच पसरलं…सुजाताच्या दाताचं आता कसं होणार या चिंतेत आई वडील पडले होते. चिंता करू नका अशी खूण करत बालदंतरोग तज्ज्ञ डॉ. भाग्यश्री यांनी सुजाताशी गप्पा मारात डोरेमॉन आवडतो की पोकेमॉन… मिकी-माऊस चांगला की अॅव्हेंजर्स असा प्रश्न केला. सुजाताला बी शिल्डवर असलेले डोरेमॉन आवडतो हे पाहून बी शिल्ड घालायला दिली. आणि हळूच तिच्या दुखणाऱ्या दातावर उपचारही केले. करोना काळात पीपीइ किट घालून लहान मुलांच्या दातावर हसत खेळत उपचार करण्याच एक वेगळच तंत्र डॉ भाग्यश्री पवार यांनी निर्माण केले असून देशात व परदेशातही त्याची दखल घेतली जात आहे.

खरंतर करोना काळात एकूणच खासगी दवाखाने चालविणाऱ्या वैद्यक जमातीने आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु करावे यासाठी सरकारने आदेश काढले. कायद्याचा बडगा दाखवला तरीही बहुतेक डॉक्टरांनी आपले दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर दंत चिकित्सकांची परिस्थितीत थोडी वेगळी म्हणावी लागेल. ‘भारतीय दंत चिकित्सा परिषदे’ने ही दंत चिकित्सकांना सुरुवातीला व्यवसाय बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता.

दाताचं दुखणं हे असं विचित्र दुखणं असतं की ते सहन करणे मोठ्या लोकांनाही शक्य होत नाही तिथे लहान मुलांची अवस्था काय होत असेल याची कल्पनाही करणे कठीण. सुजाताचा दात दुखू लागला तसं तिने रडून रडून घर डोक्यावर घेतलं. त्रस्त आई वडील बालदंतरोग तज्ज्ञांना फोन केले खरे पण कोणीच उपचारासाठी उपलब्ध नव्हते. अखेर डॉ. भाग्यश्री यांना फोन केला तेव्हा सुजाताची माहिती घेऊन तात्काळ दवाखान्यात यायला सांगितले. जे कोणी दंतततज्ञ सध्या उपचार करत आहेत ते संपूर्ण पीपीइ किट, फेस शिल्ड, हातमोजे व आवश्यक ती सुरक्षा बाळगूनच उपचार करतात. कारण यात रुग्णाच्या तोंडाजवळ जाऊन काम करायचे असल्याने संसर्गाचा धोका मोठा असतो. याबाबत डॉ. भाग्यश्री म्हणाल्या “दाताचा त्रास असलेली लहान मुलं जेव्हा आमच्या दवाखान्यात येतात तेव्हा तेथील डेंटल चेअर व लाईटस आदी बघून आधीच ते घाबरतात. त्यात पीपीई किट घातलेला अवतार त्यांना पूर्ण घाबरवून सोडतो. याचा विचार करून थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून लहाना मुलांना आवडणाऱ्या डोरेमॉन, पोकेमॉन, मिनी ऑन, जेरी, युनिकॉर्न आदी आठ कार्टून असलेल्या ‘बी शिल्ड’ बनवल्या. यासाठी बायोडिग्रेडेबल मटेरियल वापरले. उपचारासाठी येणारी लहान मुले कोणत्या तरी कार्टूनच्या प्रेमात असतात. त्यांच्याशी बोलून माहिती घेतली की त्यांच्या आवडीचे कार्टून असलेली ‘बी शिल्ड’ त्याला घालायला देतो आणि मीही पीपीइ किटबरोबर कार्टून असलेली फेस शिल्ड लावून गप्पा मारत लहान मुलांच्या दाताचे उपचार करायचे.”

सुजातावरही असेच उपचार केले. यातील महत्वाचा भाग म्हणजे थ्रीडी प्रिंटिंग करून बायोडिग्रेडेबल म्हणजे पर्यावरण स्नेही सामान वापरून यापूर्वी कोणी अशा प्रकारे उपचार केले नव्हते, असे सांगून डॉ. भाग्यश्री म्हणाल्या “अमेरिकेतही लहान मुलांवर अत्यावश्यक दंतोपचार करताना कार्टूनच्या स्टिकरचा वापर केला जातो. वेबिनारवर जेव्हा अमेरिकेतील दंततज्ञांना हे सांगितले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. चीली मधील वैद्यक परिषद यावर पेपर प्रसिद्ध झाला असून भारतात व परदेशातही वेबेनारवर आता बायोडिग्रेडेबल थ्रडी कार्टून संकल्पना स्वीकारली जात आहेत” असंही डॉ. भाग्यश्री म्हणाल्या. करोनात भलेभले दंततज्ञ आपले दवाखाने बंद करून बसले असताना लहान मुलांच्या दातावरील उपचाराचे करोनाकालीन आव्हान स्वीकारताना डॉ. भाग्यश्री यांनी निर्माण केलेले कल्पक तंत्र नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.