उच्च न्यायालयाकडून पोलीस-विशेष न्यायाधीशांचे कौतुक

मुंबई : बालकांवरील ‘लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यां’तर्गत (पोक्सो) सुनावण्यात आलेली शिक्षा कायम करताना या प्रकरणाचा तपास आणि खटला वर्षभराच्या आत निकाली काढल्याबाबत उच्च न्यायालयाने सिंधुदुर्गनगरी पोलीस तसेच विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांचे कौतुक केले आहे.

आरोपींच्या अपिलावर निकाल देताना न्यायमूर्ती रेवती ढेरे यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांच्या कामाचे विशेषकरून कौतुक केले आहे. ‘पोक्सो’ कायद्यानुसार एक वर्षांच्या कालावधीत तपास पूर्ण करून खटला निकाली काढण्याची तरतूद आहे. पोलीस आणि न्यायाधीशांनी या कालावधीत आपल्यासमोर असलेल्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून खटला निकाली काढला हे कौतुकास्पद आहे, असे न्यायालयाने म्हटले. जलद न्यायदान हा सामाजिक न्यायाचा घटक आहे. जलद न्यायदानामुळे समाज समाधानी असतो. लवकर न्यायदानामुळे गुन्हेगार दोषी असल्यास त्याला शिक्षा होते वा तो निर्दोष असल्यास त्याची कारागृहात खितपत पडण्यापासून सुटका होते, असे न्यायालयाने नमूद केले.

पोलिसांच्या तपासाचे हे एक आदर्श प्रकरण असल्याचे नमूद करत न्यायालयाने सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या जलद आणि अचूक तपासाचेही यावेळी कौतुक केले. तपास कसा करावा हे या तपासातून पोलिसांनी दाखवून दिले आहे असेही न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाचा तपास एका महिन्यात पूर्ण करण्यात आल्याकडे न्यायालयाने प्रामुख्याने लक्ष वेधले. तसेच हे दुर्मीळ असल्याचे न्यायालयाने म्हटले.

अपील फेटाळले

दरम्यान आरोपीचे अपील न्यायमूर्ती डेरे यांनी फेटाळले. तसेच विशेष न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून सुनावलेली १२ वर्षांची शिक्षा कायम ठेवली. बलात्कार पीडितेला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई योजनेनुसार या मुलीला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याचे निर्देशही न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले.