मुंबई : सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टय़ा न लावता वावरणाऱ्यांना आता पालिकेच्या कारवाईबरोबरच पोलिसी कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. नागरिक, दुकानदार, विक्रेते, उपाहारगृहांमध्ये काम करणारे कर्मचारी, प्रभातफेरीला जाणारे नागरिक अशा सगळ्यांवर ही कारवाई होणार आहे. त्याकरिता पोलिस व वाहतूक पोलिसांचीही मदत घेण्यात येणार असून कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टय़ा न लावताच फिरणाऱ्यांविरोधात पालिकेने कडक कारवाई केल्यानंतरही अनेक जण नियमांचे पालन करीत नाहीत. मुखपट्टय़ा लावल्या तरी त्या हनुवटीवर ओढून ठेवलेल्या असतात. करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मुखपट्टया लावणे हा प्रतिबंधात्मक उपाय असल्यामुळे पालिकेने आता आणखी कठोर भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

मुखपट्टय़ा न लावताच फिरणाऱ्यांकडून आधीच २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. आजतागायत ४० हजारपेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.  ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दृक्श्राव्य माध्यमातून याबाबत निर्देश दिले.

त्याकरीता मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांची मदत घेण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत. या बैठकीला पालिका अधिकाऱ्यांसोबतच मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते.

आराखडा तयार करा

सध्या पालिकेच्या २४ विभागांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे. मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याकरीता पोलिसांची तसेच नगरसेवकांची मदत घ्यावी व ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.