मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे पाण्यावरून संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तशी परिस्थिती उद्भवल्यास महाराष्ट्र पोलिसांनी सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित दुष्काळी भागांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र दुष्काळ असून पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष पसरला असून संघर्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळी भागांत सावधगिरी बाळगण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे.
दंगलसदृश परिस्थिती उद्भवल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत ग्रामीण भागातील लोकांनी मुंबई, पुणे तसेच गावाजवळील अन्य प्रदेशांमध्ये जाऊन उपजीविकेची साधने शोधण्यासाठी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पाण्याच्या तीव्र दुर्भिक्षामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, अशी भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
संघर्षमय स्थिती निर्माण झाली आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली तरी वरिष्ठांकडून आदेश आल्याशिवाय पोलिसांनी कोणतीही कठोर पावले उचलू नयेत, असेही निर्देश स्थानिक पोलिसांना देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळ पडला असून १९७२ नंतर महाराष्ट्रात पडलेला हा भीषण दुष्काळ असल्याचे मानले जात आहे.
दुष्काळग्रस्त जिल्हे
सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद