ब्रिटिशांच्या काळात मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये स्थिरावलेली बोलीभाषा आजही बऱ्यापैकी कायम आहे. क्राइम रजिस्टर, एनसी बुक, डिस्टिक, मिल डायरी, स्टेशन डायरी, लॉकअप रजिस्टर हे शब्द पोलिसांच्या तोंडावर इतके रुळले आहेत की, आजही ते पोलीस ठाण्यात सहजच कानावर पडतात. अगदी अलीकडे पोलिसांना ‘आडवं बुक’ही आवडते होते. परंतु बेकायदेशीर काहीही करायचे नाही, असे आदेश जारी झाले आणि ‘आडवं बुक’ हद्दपार झाले आहे. पोलीस ठाण्यांना सहजगत्या मिळणारी ‘पुडी’ही आता व्यक्तिकेंद्रित होऊन तिची जागा ‘तोडी’ने घेतली आहे.
पोलीस ठाण्यातील कामकाजावर ब्रिटिशांच्या काळातील कार्यपद्धतीचा इतका प्रभाव आहे की, हेच शब्द आजही वापरले जात आहेत. ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याला डिस्टिक संबोधले जात होते. आजही हा शब्द वापरला जातो तो पोलीस ठाण्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या पोलिसासाठी. ‘स्टेशन हाऊस’ हा शब्दही त्याच पठडीतला. हवालदार आणि त्याला मदत करणाऱ्या तिघा शिपायांना ‘डिस्टिक स्टाफ’ संबोधण्याची पद्धत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ब्रिटिश राजवटीत मुंबईत कापड उद्योगावर बरेच अवलंबून असे. त्यामुळे मुंबईतील गिरण्या, कामगारांचे आंदोलन व त्यांच्यातील असंतोष, कामगार संघटनांच्या हालचाली आदींची गोपनीय माहिती पोलिसांकडून गोळा करून ती ठेवली जात असे. त्याला ‘मिल डायरी’ संबोधले जाते. आजही गोपनीय माहितीसाठी ‘मिल डायरी’ वापरली जाते व ती गोळा करणाऱ्याला ‘मिल स्टाफ’ म्हटले जाते. दखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद करण्यासाठी क्राइम रजिस्टर, तर अदखलपात्र गुन्ह्य़ाच्या नोंदीसाठी एनसी रजिस्टर हे शब्द वर्षांनुवर्षे कायम आहेत. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या नोंदीसाठी ‘स्टेशन डायरी’ तसेच पोलीस कोठडीतील गुन्हेगारांसाठी ‘लॉकअप रजिस्टर’ हे शब्द ब्रिटिशकालीनच आहेत.
या व्यतिरिक्त पोलिसांकडून ‘आडवं बुक’ वापरले जात होते. पोलीस ठाण्यात आलेली तक्रार किरकोळ स्वरूपाची असेल आणि तक्रारदाराच्या समाधानासाठी ती ज्यात नोंदवून घेतली जात होती, त्याला ‘आडवं बुक’ म्हटले जाते. पोलीस ठाण्यातील गुन्ह्य़ांची संख्या वाढू नये, यासाठी ‘आडवं बुक’ ही क्लृप्ती पोलिसांनी काढली. मात्र अरुप पटनाईक हे पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी ‘आडवं बुक’ हद्दपार करून टाकले.

पोलीस ठाण्यात येणारी प्रत्येक तक्रार नोंदली गेली पाहिजे. त्यामध्ये काही तक्रारी दखलपात्र तर काही अदखलपात्र स्वरूपाच्या असू शकतील. याचा अर्थ या तक्रारी पोलीस ठाण्याच्या नोंदीवर आल्या आहेत. परंतु गुन्ह्य़ांची संख्या वाढू नये, यासाठी एका वेगळ्या डायरीत किरकोळी चोरी वा तक्रारींची नोंद घेतली जात होती. ती आता कायमची रद्द करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची तक्रार नोंदवून घेतलीच पाहिजे.
– राकेश मारिया, पोलीस आयुक्त