दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी बनावट नोटांची छपाई करणाऱ्याला मुंबई क्राइम ब्रांचने पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पटकथा लेखक असून काही हिंदी मालिकांसाठी त्याने लेखन केलं आहे. पोलिसांनी आरोपीला पाच लाखांच्या बनावट नोटांसहित अटक केली आहे. एका बॅगेत या सगळ्या नोटा भरुन आरोपी जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं.

आरोपीचं नाव देवकुमार पटेल असून नालासोपाऱ्यात राहतो. क्राइम ब्रांचला आरोपी देवकुमार बनावट नोटांची तस्करी करत असल्याची शंका आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला एक बॅग सापडली असून त्यामध्ये पाच लाख 78 हजार रुपयांच्या बनावट नोटा होत्या. आम्ही सर्व नोटा तपासणीसाठी नाशिकमधील लॅबमध्ये पाठवल्या आहेत’.

पोलिसांना बॅगेत 2000, 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. देवकुमार पटेल याने दोन लग्नं केली असून एक पत्नी मॉडेल आणि दुसरी गृहिणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवकुमार दोन्ही पत्नींचा खर्च भागवण्यासाठी बनावट नोटा छापत होता. या नोटा बदली करण्यासाठी तो घेऊन चालला होता. आरोपीने काही नोटा मध्य प्रदेशात वापरल्या होत्या. ग्रामीण भाग असल्याने तिथे कोणालाही संशय येण्याची शक्यता नसल्याने बनावट नोटांचा वापर केला होता.

तुमच्या हाती बनावट नोट आली तर काय कराल ?
एटीएममधून पैसे काढत असताना जर बनावट नोट तुम्हाला मिळाली तर सर्वात आधी ती नोट एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर दाखवा आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकाला याची माहिती द्या. यासोबत बँकेतही कळवा. याशिवाय बाजारात किंवा अन्य ठिकाणी समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेतल्यानंतर नोट बनावट तर नाही ना याची तपासणी करुन घ्या. तरीही बनावट नोट तुमच्या हाती आली तर जवळच्या बँकेत जाऊन डिपॉझिट करा आणि त्यांच्याकडून पावती घेण्यास विसरु नका.