बेदरकारपणे गाडी चालवून ऑटोरिक्षाला धडक दिल्या प्रकरणी गायक आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यानंतर काही वेळातच त्याचा जामीन मंजूर करण्यात आला असून बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी त्याला दहा हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. आदित्य त्याची मर्सिडिझ कार चालवत असताना हा अपघात घडला. या अपघातात ऑटोरिक्षाचा चालक जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. रिक्षामधील महिला प्रवासीही जखमी झाली आहे.

कलम ३३८ आणि २७९ अंतर्गत आदित्य नारायण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य नारायण प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.अपघातानंतर आदित्य नारायण घटना स्थळावरुन पळून गेला नाही उलट त्याने दोघांना रुग्णालयात नेले असे पोलिसांनी सांगितले. काही वेळापूर्वीच आदित्य नारायणला जामीन मिळाला. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पोलिसांनी आदित्यची मर्सिडिझ पुढील तपासासाठी ताब्यात घेतली आहे. मागच्यावर्षी रायपूर विमानतळावर हवाई कंपनीच्या कर्मचाऱ्याबरोबर वाद घातल्यामुळे आदित्य नारायण चर्चेत आला होता. अतिरिक्त वजन सोबत घेऊन जात असल्यामुळे त्याला रोखण्यात आले त्यावरुन त्याने वाद घातला होता.

”तेरी चड्डी ना उतारी तो मेरा नाम आदित्य नारायण नही हैं” अशी धमकी त्याने दिली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तातड तातड हे आदित्यचे गाणे लोकप्रिय झाले होते. अभिनयाच्या क्षेत्रातही त्याने नशीब आजमावून पाहिले होते. २०१० साली शापित चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला अभिनेता म्हणून म्हणावे तसे यश मिळाले नाही.