गरिबीने त्रासलेल्या बांगलादेशी मुलींना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना भारतात आणून छुप्या मार्गाने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालाच्या वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. नोकरीसाठी आलेल्या आणि फसलेल्या मुलींसमोर परदेशात दुसरा मार्गच नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर अली आहे.

दुसरीकडे अटकेत असलेल्या दलालाने आतापर्यंत बांगलादेशातून तब्बल ५०० मुलींची फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसायात अडकविल्याचे समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. मुलींची तस्करी हे मोठे रॅकेट असून या प्रकरणातील अन्य ११ आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मागच्यावर्षी पोलिसांनी वेश्याव्यवसायावर छापा घालून चार मुलींची सुटका केली होती. या चार मुली बांग्लादेशी होत्या आणि त्यांना फसवणूक करुन या व्यवसायात आणण्यात आले होते. तेव्हापासून मुलींना फसवून आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होते. मात्र टोळीचा म्होरक्या सैंदुल (४०) पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाचे प्रमुख जितेंद्र वनकोटी, हितेंद्र विचारे यांच्या पथकाने सैदुलला अटक केली.

सैदुल हा बांगलादेशी नागरिक आहे. बांगलादेशातल्या गरीब मुलींना भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना तो बेकायदेशीरपणे भारतात आणत असे आणि विविध ठिकाणी कुंटणखान्यात वेश्याव्यवसायासाठी विकत असे.

एका वर्षात पाचशे मुलींची तस्करी
सैदुलच्या कार्यपध्दतीबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी सांगितले की, सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे. तो त्यांना भारत बांग्लादेशाच्या सीमेवरून चोरट्या मार्गाने भारतात आणायचा आणि देशाच्या विविध भागात विकायचा.

अल्पवयीन मुलगी असेल तर किमान १ लाख रुपये आणि इतर तरुणींना ५० ते ६० हजारांत विकायचा. यानंतरही दरमहिन्याला त्याला कुंटणखान्यातून या मुलींच्या मोबदल्यात ठराविक रक्कम मिळत असे. वसईत त्याच्याविरोधात ४ गुन्हे दाखल असून मुंबई, पुणे आदी ठिकाणी त्याने मुली पुरविल्याचे पोलिसांना सांगितले. मागील वर्षभरात त्याने किमान ५०० मुलींना भारतात आणून विकले होते. या मुलींना वेश्याव्यवसायास भाग पाडून कुंटणखान्यातून त्यांना दरमहा ५ हजार रुपये मिळायचे.