कुलाबावाडीतील तळ अधिक दुमजली घरात श्वेता तांडेल (२८) ही विवाहित महिला पती महेंद्र, दीर चेतन आणि त्याचा मित्र हितेश याच्यासह राहत होती. १० मे रोजी श्वेता यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह बाथरूममध्ये आढळला होता. कुणी तरी घरात घुसून हत्या केली होती. मूळ पालघर येथे राहणारे हे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी येथे आले होते आणि मुंबईत स्थायिक झाले होते. तळमजला गंगा भंडारी या महिलेला भाडय़ाने देण्यात आला होता तर पहिल्या मजल्यावर श्वेता व महेंद्र हे दाम्पत्य राहत होते. दुसऱ्या मजल्यावर दीर आणि त्याचा मित्र हितेश कर्तकपंडी (२३) राहत होता. हितेश हा मूळचा पालघरचा. नोकरीच्या निमित्ताने तोही मुंबईत आलेला. कुलाबा येथील पुमा शोरूममध्ये नोकरीला होता. श्वेता यांना तो बहिणीप्रमाणे मानत होता. तोही पालघरचा असल्यामुळे तांडेल यांच्या कुटुंबातील एक बनला होता.

१० मे रोजी महेंद्र हे श्वेताच्या मोबाइल फोनवर सतत संपर्क साधत होते; परंतु काहीही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते चिंतित होते. तळमजल्यावर राहणाऱ्या गंगा यांना संपर्क साधून त्यांनी श्वेता घरी नाही का, अशी चौकशी केली. गंगाचा मुलगा पवन पहिल्या मजल्यावर गेला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. घरातील वातानुकूलन यंत्रणा तसेच दिवे सुरू होते. त्यामुळे काही तरी गडबड आहे असे वाटल्याने त्याने आईला सांगितले. गंगा स्वत: पहिल्या मजल्यावर आल्या आणि त्यांनी आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला. घरात शिरल्या तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये श्वेता यांचा मृतदेह आढळून आला. लगेच त्यांनी महेंद्रला कळविले. श्वेताला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

वर्षभरापूर्वीच महेंद्र आणि श्वेता यांचे लग्न झाले होते. ज्या पद्धतीने हत्या झाली होती ती पाहता ओळखीच्या व्यक्तीवरच पोलिसांचा संशय होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतर कुलाबा पोलिसांचा पहिला संशय पती महेंद्रवरच होता; परंतु शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता दाम्पत्यामध्ये कधीही भांडण होत नव्हते वा तसे काहीही जाणवत नव्हते. किंबहुना बऱ्याच वेळा दोघे फिरायलाही जात असत. तरीही पोलिसांनी महेंद्रसह चेतन आणि हितेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिघांची कसून चौकशी झाली. त्यापैकी महेंद्र आणि चेतनबाबत पोलिसांना काहीही वाटत नव्हते; परंतु हितेशने दिलेल्या माहितीवरून पोलिसांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या; परंतु जोपर्यंत ठोस काहीही हाती लागत नाही तोपर्यंत कारवाई करायची नाही, असा उपायुक्त मनोज शर्मा यांचा आदेश होता. कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय धोपावकर यांच्यासह माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे हेही या तपासकामात गुंतले होते. काही वेळा पोलिसांना महेंद्रवरही संशय येत होता.

सकाळी पावणेनऊच्या सुमारास महेंद्र आणि चेतन कामावर जायला निघतात. त्यानंतर हितेश नोकरीसाठी जातो. साडेबाराच्या सुमारास महेंद्र घरी जेवण्यासाठी येतात; परंतु त्याआधी ते फोन करतात. त्या दिवशी त्यांचा श्वेताबरोबर संपर्कच होत नव्हता.

महेंद्र आणि चेतन नेहमीप्रमाणे पावणेनऊ  वाजता निघाले. आपण कामावर जायला निघालो होतो तेव्हा श्वेताचा दरवाजा बंद होता. बाहेर कुणाचे तरी बूट होते. त्यामुळे आपण दरवाजा ठोठावला नाही आणि तसेच निघालो, असा दावा हितेशने पोलिसांकडे केला; परंतु उपायुक्त शर्मा यांच्या मनात प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. श्वेताला बहीण मानतो तर त्या वेळी त्याने घरात नेमके कोण आले होते, याची चौकशी का केली नाही? दररोज सकाळी नाष्टा करण्यासाठी हितेश जातो, मग त्या दिवशी का गेला नाही? दुपारी चेतनचा जेवणाचा डबाही हितेशच पोहोचवतो. मग त्या दिवशी जेवणाचा डबा का नेला नाही? आदी प्रश्नांची उत्तरे देताना उडवाउडवीची उत्तरे देणारा हितेश अगदी ठाम होता. मी तिला बहीण मानत होतो, मी तिची हत्या कशी करीन वगैरे वगैरे पालुपद तो लावत होता. अगदी महेंद्र वा चेतनही त्याच मताचे होते. किंबहुना श्वेताच्या व्हॉटस्अ‍ॅपवर अनेक मित्रांचे संदेश तो पोलिसांना दाखवत होता. त्यापैकी कुणी तरी आले असावे, असेही तो सांगत होता; परंतु वरील तीन प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वेळी वेगळी देणाऱ्या हितेशला बोलते करण्यास उपायुक्त शर्मा यांना वेळ लागला नाही आणि हत्येला ७२ तास होण्याआधीच हितेशने कबुली दिली होती.

१० मे रोजी आपण नाष्टा करण्यासाठी श्वेताकडे गेलो. तिच्याकडे आपण लैंगिक सुखाची मागणी केली. तिने नकार दिला. त्यामुळे आपण जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिने ढकलून दिले. नंतर मीही तिला ढकलले. ती खाली पडली. आरडाओरड करू लागली. त्यामुळे किचनमधील चाकू घेऊन तिच्या गळ्यावर वार केले. क्षणार्धात ती निपचित पडली. तिला खेचत बाथरूममध्ये नेले. त्यानंतर जमिनीवर सांडलेले रक्त पुसले. घराबाहेर आलो. दरवाजा बंद केला. लॅच असल्यामुळे दरवाजा आतून बंद झाला. वरच्या मजल्यावर गेलो. अंघोळ केली आणि नोकरीसाठी निघून गेलो, हितेश शांतपणे सांगत होता. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी अनेक थिअऱ्या, पोलिसांची पथके सज्ज झाली होती. त्या काळात सदर परिसरात येणाऱ्या असंख्य अज्ञात व्यक्तींची माहितीही पोलिसांनी काढली होती. जवळच असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरूही झाला होता; परंतु हितेशच्या कबुलीने असुरक्षित मुंबईत महिलेची घरात घुसून झालेली हत्या ही जवळच्या व्यक्तीनेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनाही सुटकेचा नि:श्वास सोडला.

निशांत सरवणकर

@ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com