मुंबईच्या धारावी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील पैसे लुटणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री साताऱ्यात अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्यावर एका ट्रॅव्हल्स बसमधून या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून १५ लाख ४० हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या चौकशीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला आहे.

धारावीत गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धारावीतील ओएनजीसी कंपनीसमोरील एसबीआय एटीएम यंत्रात रोक ड भरण्यासाठी लॉजीकॅशची व्हॅन आली. व्हॅनमध्ये चालक आणि तीन कर्मचारी होते. तसेच रोकड भरलेल्या दोन पेटय़ा होत्या. त्यातली एक पेटी तीन कर्मचाऱ्यांनी उचलली. ते एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेले. ते परतले तेव्हा व्हॅनचा दरवाजा सताड उघडा होता. तसेच १ कोटी ५६ असलेली पेटीही गायब होती. चोरी झाल्याची माहिती कंपनीच्या मुख्यालयातून धारावी पोलिसांपर्यंत पोहोचली. दिवसाढवळया इतक्या सहजपणे चोरी झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अप्पर आयुक्त रावसाहेब शिंदे, उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्यासह गुन्हे शाखेची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर सर्व चक्रे वेगाने फिरली होती. तपासादरम्यान, या प्रकरणातील संशयित खासगी ट्रॅव्हल्स बसने बंगळुरूला रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी काल रात्री लगेचच सापळा रचत आणेवाडी टोलनाक्यावरून तिघाजणांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. नऊ जणांच्या टोळीने मिळून ही कॅश व्हॅन लुटल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्वजण तामिळनाडूचे असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान, या तिघांकडून इतरजणांची नावे समजल्यानंतर काल रात्रीच मुंबई पोलिसांची पथके तामिळनाडूला रवाना झाली होती.