दीड तासात मुद्देमाल हस्तगत

प्रसंगावधान राखले तर गुन्हेगाराला नक्कीच पकडता येते, हे वांद्रे येथे राहणाऱ्या २९ वर्षीय सदप मकदूम हिने सिद्ध केले. लग्नसमारंभासाठी घरातील सर्व परदेशी गेले असताना, एकटीच राहात असलेली सदप २९ मे रोजी नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यास गेली होती. व्यायाम करुन परतल्यावर घरात चोरटय़ांनी प्रवेश केल्याचे कळल्यानंतर हातपात न गाळता, सदपने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीतील रहिवाशांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळावरुनच एका चोरटय़ाला पकडून उरलेल्या दोन चोरटय़ांना पकडत अवघ्या दीड तासात चोरीला गेलेली सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

वांद्रे पूर्वेला असलेल्या न्यायालयाजवळच्या साईकृपा सोसायटीच्या सातव्या माळ्यावर मकदूम कुटुंबीय राहतात.  २९ मेच्या सकाळी पहाटे पाच वाजता सदप एरोबिक्सच्या वर्गाला घर बंद करुन गेली. साडेसहाच्या सुमारास ती परतल्यावर दाराला कुलुप नसल्याचे तिने पाहिले. दार किलकिले करुन पाहिले असता, पिवळ्या रंगाचा एक मुलगा घरात फिरताना तिला दिसून आला. प्रकार लक्षात येताच क्षणार्धात दार लोटून घेत सदपने कडी लावली आणि खाली धाव घेत सोसायटीच्या सचिवांना हा प्रकार सांगितला.

सचिवांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर गस्तीवरील निर्मल नगर पोलीसांचे पथक घटनास्थळी अवघ्या काही मिनिटांत पोहोचली.

पोलिस सोसायटीच्या आवारात दाखल होत असतानाच, एक किशोरवयीन मुलगा सोसायटी आवारात पोलिसांना दिसला, पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. सुगावा लागतच   प्रसाधनगृहाच्या काचा काढून अवघ्या दीड फूटाच्या खिडकीतून चोरांनी सांडपाण्याच्या वाहिनीच्या आधारे पळून गेल्याचे पोलिसांच्या घरी आल्यावर लक्षात आले.

पंचनाम्यात साधारण ३.१५ लाख रुपयांचे सामान गेल्याचे स्पष्ट झाले.  ज्या मुलाला ताब्यात घेतले, त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याच दोन मित्रांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याचे निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव जमदाडे यांनी सांगितले.

दोन्ही मित्र वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा परिसरात राहणारे असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने तिकडे रवाना झाले आणि उस्मान गनी इक्बाल सय्यद (१९वर्षे) आणि एका अल्पवयीन मुलाला त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला सर्व ऐवज पोलिसांनी मिळवला. अमली पदार्थ सेवनासाठीआणि मौजमजा करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.