माऊंट मेरी जत्रा आणि गणेशोत्सवात डल्ला मारण्यासाठी आलेल्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी १० लाख ४४ हजाराचे ५१ मोबाइल जप्त केले आहेत. विशाल गंगा महतो (वय १९) असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा झारखंडचा आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या एका खबऱ्याने यासंदर्भातली माहिती पोलिसांना दिली ज्यानंतर या चोरट्याला जेरबंद करण्यात आले.

चोरट्याकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल गावदेवी, काळाचौकी, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहीसर, बोरिवली, मीरा रोड, विरार या भागातले आहेत अशी माहिती समोर आली आहे. विशाल गंगा महतोला सापळा लावून अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत महतोची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने आपण माऊंट मेरी जत्रा आणि गणेशोत्सवात मोबाइल चोरण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत आपण ५१ मोबाइल चोरल्याचीही कबुली त्याने दिली. उपायुक्त विनयकुमार राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे, पोलीस निरीक्षक प्रदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण, पोलीस नाइक संखे, पोलीस शिपाइ राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.