तक्रार, गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्यांशी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे यासाठी आजवर वरिष्ठ पातळीवरून बरेच उपाय योजले गेले; परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. गोरेगाव पोलीस ठाण्यातील निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या कृतीने ही बाब पुन्हा एकदा उघड झाली. पाटील यांनी तक्रार देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला आणि त्याच्या मित्राला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद गोरेगावमध्ये उमटले. मंगळवारी गोरेगावच्या व्यापारी संघाने पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून निषेध नोंदवला.

नीरव भट यांचे गोरेगावच्या एम. जी. मार्गावर चष्म्याचे दुकान आहे. १३ एप्रिलला रात्री दुकान बंद करून भट घरी निघालेले असताना दोन तकुणांनी दारूच्या बाटल्या त्यांच्या दुकानाच्या दिशेने भिरकावल्या. जाब विचारता दोन्ही तरुणांनी हुज्जत घातली.म्हणून भट यांनी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा ऋषीही (२३) वडिलांसोबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी अदखल पात्र गुन्हय़ाची नोंद केली. भट पिता-पुत्र घरी आले. मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीस ठाण्यात येण्याची विनवणी करणारा दूरध्वनी भट यांना आला. पोलिसांनी बोलाविल्याचा समज करून घेत पिता-पुत्र पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. प्रत्यक्षात तो दूरध्वनी आरोपी तरुणांच्या पालकांपैकी एकाचा होता.

प्रकरण पुढे नेऊ नका, चूक झाली, पुन्हा असे होणार नाही, अशी विनणी पालक करत होते. त्यांच्याशी बोलत असताना अचानक पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील तेथे आले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी पाहून धक्काबुक्की करत प्रत्येकाला बाहेर निघा, असा दम भरला.

पोलीस निरीक्षकावर कारवाईचे आश्वासन

ऋषीसोबत पोलीस ठाण्यात आलेल्या मेहूल नावाच्या मित्राच्या पाठीत धपाटा घातला. आम्ही तक्रार देणारे आहोत, आम्हाला का मारताय, असे विचारता पाटील यांनी ऋषीला आणखी मारहाण सुरू केली. अगदी जमिनीवर लोळवून पाटील ऋषीला मारत होते, असे भट यांनी सांगितले. पाटील यांच्याविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक भास्कर जाधव यांनी हात वर करत ही कारवाई आमच्या अखत्यारीत नाही, असे उत्तर देऊन हात वर केले. ही बाब समजताच गोरेगावच्या व्यापारी संघाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा साहाय्यक आयुक्त एस. जी. शिंदे यांनी भट यांना मंगळवारी सकाळी बोलावून घेत चर्चा केली. शिंदे यांनी भट यांची तक्रार ऐकून घेत पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.