धान्य घ्यायला आलेल्या जमावाचा अचानक आक्रमक पवित्रा

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी गोळा झालेल्या दोन ते तीन हजारांच्या जमावामागचे गूढ वाढत चालले आहे. एकीकडे रेल्वेगाडी सुटण्याच्या अफवेने हे परप्रांतीय येथे जमा झाल्याचे बोलले जात असले तरी, प्रत्यक्षात या गर्दीतील बहुसंख्य जण वांद्रय़ाच्याच शास्त्रीनगर या झोपडपट्टीतील असल्याचे वांद्रे पोलिसांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आधीपासूनच सुरू असलेल्या धान्यवाटपादरम्यान अचानक काही जणांनी आपापल्या गावी जाण्यासाठी घोषणा सुरू केल्या आणि म्हणता म्हणता संपूर्ण जमाव त्या तऱ्हेने घोषणाबाजी करू लागला, असे समोर येत आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकाशेजारीच(पश्चिमेकडे) बेस्टचेही स्थानक आहे. त्यामागे शास्त्रीनगर एक, दोन, तीन या क्र माने मोठी झोपडपट्टी आहे. या वस्तीत उत्तर भारतातून पोटापाण्यासाठी आलेले मजूर मोठय़ा संख्येने वास्तव्य करतात. या वस्तीत कु टुंबांऐवजी पुरुष पुरुष मिळून राहाणाऱ्या मजुरांचे प्रमाण जास्त आहे. यातील काही मजूर टाळेबंदीपूर्वीच आपापल्या गावी निघून गेले. मागे राहिलेल्यांना १४ एप्रिलला टाळेबंदी हटेल, रेल्वे सेवा सुरू होईल आणि आपल्याला गावी जाता येईल अशी आशा होती. ती मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढवून फोल ठरवली. त्यामुळे या वस्तीत सकाळपासूनच अस्वस्थता होती.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वस्तीच्या तोंडावर सुन्नी जामा मशीद आहे. टाळेबंदी सुरू झाल्यापासून मशिदीजवळच विविध स्वयंसेवी संस्था वस्तीतल्या मजुरांना, गोरगरिबांना तयार अन्न, शिधा वाटप करत होत्या. मंगळवारीही तेथे सुमारे एक हजार व्यक्तींना शिधावाटप करण्यात येणार होते. त्यानिमित्त तेथे गर्दी जमू लागली होती. उपस्थित गर्दीत काही व्यक्तींनी आम्हाला मदत नको, गावी जाऊ द्या, अशी भूमिका मांडली. ती जमावाने डोक्यावर घेतली. शिधा घेण्यासही जमावाने नकार दिला. जे घेत होते त्यांना मज्जाव के ला गेला. हळूहळू वातावरण तापू लागताच हाके च्या अंतरावर असलेल्या वस्तीतून काय झाले हे पाहण्यासाठी अधिकाधिक गर्दी उसळली आणि पोलीस कु मक येईपर्यंत जमाव दुप्पट, तिप्पट झाला.

बळाचा वापर करताच संपूर्ण जमाव शास्त्रीनगरच्या दिशेने पळाला. पोलिसांनी पाठलाग के ला तेव्हा बहुतांश व्यक्ती आपापल्या घरात शिरताना आढळल्या. मुंबईच्या प्रत्येक उपनगरात परप्रांतीय मजुरांचा लोंढा अडकू न पडला आहे. वांद्रे येथून गावी जाण्याची व्यवस्था होणार आहे, ही अफवा क्षणात अवघ्या मुंबईत पसरली असती. या अफवेतून माहीम, दादरमधून तरी परप्रांतीयांनी वांद्रे येथे गर्दी के लीच असती. मात्र तसे घडलेले नाही, असे वांद्रे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.