निशांत सरवणकर

मुंबईत करोनाबाधितांचा आकडा हजारावर गेल्यानंतरही अनेक भागांत नागरिकांचा मुक्तसंचार सुरूच आहे. याची गंभीर दखल पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतली असून विनाकारण फिरणाऱ्यांची अजिबात गय करू नका, असे आदेश त्यांनी पोलीस दलाला दिले आहेत. अशा बेशिस्तांना काठीचा चोप मिळेलच; पण त्यांची वाहनेही जप्त केली जातील, असे पोलीस आयुक्तांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘टाळेबंदी जारी झाल्याच्या दिवसापासून राज्यात अन्यत्र पोलिसांकडून सर्रास कारवाई केली जात होती. परंतु मुंबईत आम्ही संयम राखला होता. मात्र आता टाळेबंदीचे नियम आता कठोरपणे अमलात आणले जातील,’ असेही सिंग यांनी सांगितले.

मुंबईत जे ३८१ करोनाग्रस्त विभाग ठरविण्यात आले होते, तेथे पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहेच. परंतु अन्य ठिकाणी लोन पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पालिकेनेही भाजीपाला बाजार पूर्णपणे बंद केले आहेत तर धान्याची दुकाने विशिष्ट दिवशी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. पोलिसांचा दंडुका खावा लागेलच. शिवाय अशा नागरिकांची वाहनेही जप्त केली जातील आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले.

कृपा करून नागरिकांनी आवश्यकता नसताना रस्त्यावर येऊ नये. तुम्हाला काही गरज लागली तर नियंत्रण कक्षाला माहिती द्या, मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर किंवा मला वैयक्तिक संदेश पाठवा. तुमची गैरसोय दूर केली जाईल.

– परमबीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई