27 May 2020

News Flash

गाडय़ा जमा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे

छायाचित्र सौजन्य - प्रशांत नाडकर

संचारबंदी असतानाच्या काळातही गंमत म्हणून रस्त्यावर येणाऱ्यांना दंडक्यांचा प्रसाद देणाऱ्या पोलिसांना, अशा व्यक्तींच्या गाडय़ांच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहनांचा वापर करून दुकानांभोवती गर्दी केली जात असल्याचे आढळून आल्याने अशा गाडय़ा थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचवेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ओळखपत्रे जारी करण्यासही पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे.

संचारबंदी लागू झाल्यानंतर याबाबतच्या आदेशानुसार चार किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे त्यात नमूद करण्यात आल्यामुळे एकही व्यक्ती वा वाहन रस्त्यावर दिसता कामा नये, असे अपेक्षित आहे. प्रामुख्याने घरातील एकच व्यक्ती जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडावी, असे अपेक्षा आहे. असे असतानाही काही रिकामटेकडे गंमत म्हणून फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. त्यांची गय न करण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बजावले आहे. मात्र त्याचवेळी जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाला त्रास न देण्यासही त्यांनी सांगितले आहे. टवाळखोरांना मात्र पोलीस अडवत असून त्यांना दंडुकांचा प्रसाद दिला जात आहे. दुचाकी घेऊन पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न करतानाही हे दिसत आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांच्या गाडय़ा जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्याचा बिनतारी संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहने रस्त्यावर आणून संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाहनांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांना त्यांना आवश्यक तेवढय़ाच वस्तुंची खरेदी करावी, असे आदेश असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठा साठा खरेदी केला जात आहे. दुकानदारही त्यांना आळा घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींच्या गाडय़ाच जप्त केल्या तर त्यांच्याकडून खरेदीही माफक केली जाऊ शकते, या अपेक्षेने त्यांच्या गाडय़ा ताब्यात घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ा वा या गाडय़ांवर काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय किराणा माल, औषधाची दुकाने, दूध, अंडी, पशुंचे खाद्य पुरविणारी दुकाने आदींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्रे देण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना विनाकारण पोलिसांचा त्रास सहन करावा लागणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.  संचारबंदीच्या काळात एकही वाहन दिसता कामा नये, असे आदेशही सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. अन्यथा अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

नागरिकांना त्यांना आवश्यक तेवढय़ाच वस्तुंची खरेदी करावी, असे आदेश असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठा साठा खरेदी केला जात आहे. दुकानदारही त्यांना आळा घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींच्या गाडय़ाच जप्त केल्या तर त्यांच्याकडून खरेदीही माफक केली जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:19 am

Web Title: police commissioner orders to collect vehicles abn 97
Next Stories
1 राज्यातील सर्व अपंगांना एक महिन्याचे अन्नधान, आरोग्य साहित्य घरपोच करणार
2 घरकोंडीमध्ये सापडलेल्या बालक-पालकांच्या साथीला ‘किशोर’
3 पर्यटन महामंडळाचे लक्ष आता मे महिन्यातील आरक्षणावर!
Just Now!
X