मुंबईतल्या पोलीस भरती दरम्यान झालेल्या पाच तरुणांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्देवी असून आयुक्त या नात्याने त्याला मी जबाबदार असल्याचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बुधवारी सांगितले. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मुंबईत १० जूनपासून ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. मुंबईतील अडीच हजार पदांसाठी एकूण १ लाख ६ हजार ८२५ अर्ज आले होते. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ३० हजार १९६ जण शारीरिक चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. उमेदवारांना ५ किलोमीटर अंतर धावायचे होते. परंतु धावताना धाप लागल्याने काही तरुण जखमी झाले. या जखमींपैकी मुंबईत ४ जणांचा तर नवी मुंबईत एका तरुणाचा  मृत्यू झाला होता. या पाश्र्वभूमीवर आयुक्त मारिया यांनी घाटकोपर येथील भरतीच्या ठिकाणी पाहणी केली. ज्याप्रकारे चांगल्या गोष्टींचे श्रेय मी घेतो तसेच या दुर्देवी घटनेसाठीही मी जबाबदार आहे, असे मारिया यांनी सांगितले. या उमेदवारांचा नेमका कुठल्या कारणामुळे मृत्यू झाला ते तपासण्यासाठी सहआयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांच्यामार्फत केली चौकशी जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची कुठलीही गैरसोय झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र तंदुरुस्त नसतानाही उमेदवार धावण्याच्या चाचणीसाठी उतरतात, असेही ते म्हणाले. या वर्षांच्या सुरवातीला बंदोबस्तामुळे पोलीस भरती परीक्षा शक्य झाली नाही, तसेच नंतरही ती घेणे शक्य नसल्याने जूनमध्ये ती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच ठिकाणी यापूर्वी दोन वेळा भरती प्रकिया झाली होती. गेल्या वर्षीही ६८ हजार उमेदवारांनी त्यात भाग घेतला होता अशी माहितीही मारियांनी दिली. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत १० ते १५ किलोमीटर एवढे अंतर धावावे लागते अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) एस. पी. गुप्ता यांनी दिली.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या दांडगाईमुळे पोलीस भरतीत गोंधळ
विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या वेळी मुंबई व इतर काही ठिकाणी पाच तरुण दगावल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. काही आयपीएस अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने पाच किलोमीटर धावण्याची अट घातली, त्याचा हा परिणाम आहे व त्यामुळेच पोलीस भरतीत गोंधळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. सध्या राज्यभर सुमारे १२ हजार पोलिसांची भरती सुरू आहे. परंतु या भरतीच्या वेळी धावण्याची चाचणी देताना पाच तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे भरतीत गोंधळही उडाला आणि सर्वत्र संतापही व्यक्त होऊ लागला. पोलीस भरतीचा आढावा घेताना काही मुद्दे चर्चेला आले. मुंबईत सर्वाधिक जागा असल्याने राज्यातील बहुतांश भागांतून मुले मुंबईत आल्याचे सांगण्यात आले.शारीरिक चाचणीत १० किलो मीटर धावण्याची अट होती. हा प्रस्ताव त्याचवेळी गृहंत्र्यांनी अमान्य केला. सैन्य भरतीसाठी केवळ ८०० मीटर धावण्याची चाचणी द्यावी लागते आणि पोलीस होण्यासाठी १० किलोमीटर धावण्याची अट कशी घालता असा प्रश्नही उपस्थित झाला होता. त्यानंतर महिलांसाठी तीन किलोमीटर व पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावण्याची अट ठरविण्यात आली. त्यालाही गृहमंत्र्यांची मान्यता नव्हती, परंतु त्या वेळी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा प्रस्ताव दांडगाईने रेटल्याचे सांगण्यात येते. त्यातूनच हा गोंधळ निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. परंतु आता सुमारे साडे पाच लाख उमेदवारांपैकी साडे चार लाख उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या नियमात बदल करणे अवघड आहे.

’धावताना ओढवलेल्या मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी धावण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराची डॉक्टरांमार्फत शारीरिक चाचणी करण्यात येत आहे. त्यासाठी १०० डॉक्टर तैनात आहेत.
’उमेदवारांना बिस्किट, ग्लुकोज तसेच पाणी देण्यात येत आहे.
’यापुढे सकाळची उन्हातील धावण्याची चाचणी रद्द करुन केवळ संध्याकाळीच ही चाचणी होईल. त्यामुळे २१ जून ऐवजी २८ जूनपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.