30 September 2020

News Flash

क्षयग्रस्त बालकांची हेळसांड

वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केल्यामुळे परिचारिकांनी धमकावल्याचाही आरोप पालकांनी केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिवडी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सात बालकांच्या पालकांनी परिचारिका आणि सफाई कामगारांच्या मनमानीने त्रस्त झाल्याची तक्रार केली आहे. पालकांनी गुरुवारी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार नोंदवली. वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केल्यामुळे परिचारिकांनी धमकावल्याचाही आरोप पालकांनी केला आहे.

क्षयरोग रुग्णालयातील परिचारिका आणि सफाई कर्मचारी आपल्या मुलांची हेळसांड करत असल्याची तक्रार पालकांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांच्याकडे शुक्रवारी केली होती. सोमवारी याची शहानिशा करून कारवाई करण्याचे आश्वासन डॉक्टरांनी पालकांना दिले, मात्र तक्रार केल्याने शुक्रवारपासूनच परिचारिकांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याचे पालकांनी सांगितले.

‘शनिवारी रात्री सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून आम्हाला बाहेर काढण्याची धमकी दिली. रविवारी सकाळी बाहेर न गेल्यास मुलांना इंजेक्शन देऊ असेही सांगितले. एका मुलीला खूप जोरात इंजेक्शन दिले. तिचा हात अजूनही सुजलेला आहे. त्यामुळे आम्ही सातही पालक मुलांना घेऊन रुग्णालयाबाहेर पडलो,’ असे मुलुंड येथे राहणाऱ्या पालक लक्ष्मी दासरी यांनी सांगितले.

‘माझी ११ वर्षांची असून ती अंथरुणाला खिळलेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिची औषधे बंद आहेत. परिचारिका आणि सफाई कर्मचारी दादागिरी करतात. त्यांनी १५ दिवसांत एकदाही बेडशीट बदलले नाही. आम्ही स्वत: धुऊन पुन्हा तीच वापरतो. शौचालय आणि न्हाणीघर स्वच्छ केले जात नाही. सलाइन संपल्यानंतर परिचारिकांना बोलावल्यास त्या तासभर तरी फिरकत नाहीत. मलमपट्टीही डॉक्टरांना करावी लागते,’ असे कांदिवलीला राहणाऱ्या जरीना पटेल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या आरोपाला इथल्या डॉक्टरांनीही दुजोरा दिला.

‘जखम झाल्यास मलमपट्टी करण्याचे काम परिचारिकांचे आहे. मात्र आम्ही येथे मसाज करण्यासाठी नाहीत, असे उत्तर देऊन या परिचारिका कामे टाळतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांनाच ही कामे करावी लागतात,’ असे या मुलांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर पवार यांनी सांगितले. पालक तीन दिवस मुलांना घेऊन माहीम दर्ग्याजवळ आंदोलन करत होते. गुरुवारी काही स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांनी आर. ए. किडवाई पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना शिवडी रुग्णालयात आणले. पालिकेचे उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. परिचारिका आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या छळाने त्रस्त झालेल्या पालकांनी यावेळी आपली बाजू मांडली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली. पोलिसांच्या मध्यस्थीने या सातही बालकांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची चौकशी केली जाईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल. पालिकेचे कर्मचारी असले म्हणून सूट दिली जाणार नाही.

– डॉ संतोष रेवणकर, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी

या प्रकरणामध्ये पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि रुग्णालय प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. त्यामुळे सध्या तरी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

– भागवत बनसोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर.ए.किडवाई पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 4:13 am

Web Title: police complaint against shivdi hospital staff
Next Stories
1 किनारा मार्गालगत जॉगिंग, सायकल ट्रॅक
2 महापालिकेच्या १५ शाळांना कुलूप
3 हृदयविकाराच्या झटक्याबाबत जनजागृती मोहीम
Just Now!
X