27 September 2020

News Flash

मुंबई – शिवाजी नगरमध्ये अपहरणकर्ते समजून पोलिसांनाच मारहाण

चोराने पसरवलेल्या अफवेमुळे लोकांनी पोलिसांना अपहरणकर्ते समजून बेदम मारहाण केली

संग्रहित छायाचित्र

अफवांवर विश्वास ठेवू नये असं पोलीस नेहमीच आवाहन करत असतात. मात्र तरीही लोक अफवांवर विश्वास ठेवणं आणि त्या पसरवणं काही थांबवत नाहीत. नेमका याचा फटका शिवाजी नगरमध्ये चोराला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांना सहन करावा लागला. चोराने पसरवलेल्या अफवेमुळे लोकांनी पोलिसांना अपहरणकर्ते समजून बेदम मारहाण केली. अपहरणकर्ते साध्या कपड्यांमध्ये फिरत असल्याची अफवा चोराने पसरवली होती. दरम्यान या गोंधळात संधी साधत चोरांनी पळ काढला.

शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोराला अफवा पसरवण्यास मदत करणाऱ्या अहमद शेख आणि रईस शेख या दोघांना अटक केली आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता ही घटना घडली. वडाळा टीटी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी चोराला पकडण्यासाठी शिवाजी नगरमधील अहिल्याबाई होळकर मार्गावर गेले होते.

पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध लागला होता. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी त्याची जागा शोधून काढली होती.

‘चोर शिवाजी नगर मार्केटमध्ये येणार असल्याचं कळल्यानंतर आमची टीम तिथे पोहोचली होती’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलीस चोराला पकडून जात होते तेव्हा त्याचे दोन मित्र सोबत होते. पोलिसांनी साधे कपडे घातले असल्याने चोराने मित्रांसोबत पळून जाण्याचा प्लान आखला. ‘त्यांनी बनावट पोलीस आपलं अपहरण करुन घेऊन जात असल्याची आरडओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी गर्दीतील एकाने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने अजून लोक जमा झाले’, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

गर्दी आणि गोंधळ झाल्याचा फायदा घेत चोराने तेथून पळ काढला. शिवाजी नगर पोलिसांची पॅट्रोलिंग व्हॅन पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी चोराच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 9:42 am

Web Title: police constable beaten thinking kidnappers in shivaji nagar
Next Stories
1 रेल्वे पुलांचे शतक
2 क्षयग्रस्त बालकांची हेळसांड
3 किनारा मार्गालगत जॉगिंग, सायकल ट्रॅक
Just Now!
X