पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय, अशा तीन हजारांहून अधिक करोना संशयित-बाधितांना चाचण्यांपासून उपचार मिळवून देण्यापर्यंत मोलाची मदत करणारे पोलीस शिपाई गौतम चव्हाण चार आठवडय़ांनी संसर्गमुक्त होऊन घरी परतले. प्राणवायूची पातळी खालावल्याने ते अत्यवस्थ होते.

चव्हाण जेजे मार्ग पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. शहराच्या विविध भागातून अधिकारी, अंमलदारांचा जेजे रुग्णालयात चाचण्यांसाठी राबता वाढला. या प्रत्येकाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून  चाचणी कक्षात नेणे, डॉक्टरांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मागे लागून चाचणी अहवाल विनाविलंब मिळवणे, ते संबंधितांना पोच करणे, बाधितांना आसपासच्या रुग्णालयांमध्ये खाट उपलब्ध करून देणे, बाधित पोलीस कु टुंबातील प्रत्येकाची चाचणी होईल, अहवाल वेळेत मिळेल आणि बाधित असल्यास त्यांनाही वेळेत उपचार मिळतील, यासाठी चव्हाण चार महिने सतत झटले. या सेवेबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) निशित मिश्र यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरवलेच पण  गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही चव्हाण यांची पाठ थोपटली. १५ जुलैनंतर चव्हाण  यांची करोना चाचणी होकारार्थी आल्याने त्यांना सेव्हनहिल्समध्ये दाखल केले गेले. त्यांच्या पत्नी आणि दोन मुलेही बाधित असल्याचे निष्पन्न झाले.