बडय़ा प्रस्थाच्या मुलाची नेपाळमधून सुखरूप सुटका, चेंबूरमधून बेपत्ता झालेल्या भावंडांचा तपास मात्र अधांतरी

बेपत्ता किंवा अपहृत झालेल्या बालकांचा पोलिसांकडून घेतला जाणारा शोध त्यांच्या पालकांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोवंडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या दोन प्रकरणांच्या तपासकामावरून या संशयाला वाव मिळाला आहे. पहिल्या प्रकरणात वृत्तवाहिनी समूहात बडय़ा अधिकाऱ्याच्या मुलाला पोलिसांनी नेपाळहून सहीसलामत परत आणले. मात्र दोन आठवडय़ांपासून चेंबूरच्या घाटला परिसरातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या भावंडांचा तपास अद्यापही सीसीटीव्ही चित्रणात गुरफटला आहे.

घाटला येथील कदम चाळीत राहणारा दिव्यांश सुरेंद्र राजपूत (१६) आणि त्याचा भाऊ अनुज (१४) १ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. ‘आदल्या दिवशी मुलांनी मानखुर्दला राहणाऱ्या मित्राचा मोबाइल आणला होता. आम्ही तो परत देण्यास त्यांना बजावले. त्यामुळे सकाळी साडेआठच्या सुमारास दोघे भाऊ घरातून बाहेर पडले. मात्र, ते मित्राकडे पोहोचलेच नाहीत. दिवसभर शोध घेतल्यानंतरही त्यांचा पत्ता लागेना. म्हणून मग गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,’ अशा शब्दांत या मुलांचे वडील सुरेंद्र यांनी कैफियत मांडली. ‘सुट्टी असल्याने मुलांचा सहलीला जाण्याचा बेत होता. मी नकार दिल्याने रागाने दोन्ही मुले घर सोडून गेली, असा पोलिसांचा संशय आहे; पण मी माझ्या मुलांना ओळखतो. आम्ही रागावलो, मार दिला तरीही त्यांनी राग व्यक्त केल्याचे आठवत नाही. सहलीला जाणाऱ्या मुलांचे पैसे दिव्यांशकडे होते. ते त्याने मित्रांकडे पोहोचते केले व घरी आले,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

गोवंडी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार दिव्यांश, अनुज यांनी गोवंडी रेल्वे स्थानकातून मानखुर्दऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल पकडली. दोघे सीएसएमटीला उतरले आणि भुयारी मार्गात शिरलेले दिसले. दोघांच्या पुढल्या हालचाली मात्र सीसीटीव्ही टिपू शकलेले नाहीत. भुयारी मार्गापर्यंतच्या चित्रीकरणात दोन्ही भावंडे अतिशय बावरलेल्या अवस्थेत जाताना दिसतात. मात्र, पुढे त्यांचे काय झाले, हे कळायला मार्ग नाही.

घाटला गावात साधारण पन्नास चौरस फुटांच्या एकमजली झोपडीत राजपूत कुटुंब भाडय़ाने राहते. सुरेंद्र खासगी कंपनीत मजुरी करतात. पत्नी गृहिणी आहे. दोन आठवडे होत आले तरी मुलांचा काहीच पत्ता नसल्याने राजपूत दाम्पत्य सैरभैर झाले आहे. मुलांचे दप्तर, जुने फोटो कवटाळून त्यांची आई टिपे गाळत आहे, तर सुरेंद्र त्यांच्या तपासात भटकत आहेत.

दोन आठवडय़ांनंतरही तपास पुढे का सरकलेला नाही, मुले बेपत्ता झाल्यानंतर तब्बल ४८ तासांनी राजपूत दाम्पत्यांना सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहायला मिळाले. हा विलंब कशासाठी?

हे प्रश्न गोवंडी पोलिसांच्या तपासकामाबाबत मूलभूत प्रश्न उपस्थित करत आहेत. राजपूत यांच्या मुलांच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास असा अधांतरी असतानाच, गोवंडी पोलिसांनी महिनाभरापूर्वी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महिनाभरापूर्वी एका बडय़ा वृत्तसमूहातील अधिकाऱ्याचा मुलगा असाच बेपत्ता झाला होता. त्या वेळी गोवंडी पोलिसांसह मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी समांतर तपास केला. मोबाइल लोकेशन, संबंधित ठिकाणांचे सीसीटीव्ही चित्रण यांची पाहणी करतानाच गोवंडी पोलिसांचे पथक तपासासाठी गोव्यातही धडकले होते. हा तरुण नेपाळमध्ये असल्याचे समजताच पथकाने तेथून त्याला परत आणले. दिव्यांश, अनुजच्या प्रकरणात गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केलेला नाही.

‘प्रयत्न सुरू आहेत’

या संदर्भात विचारणा केली असता गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी तपासात भेदभाव करत नसल्याचे स्पष्ट केले. ‘आमची तीन पथके दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत. एमआरए मार्ग, आझाद मैदान, पायधुनी, कफ परेड आदी आसपासच्या पोलीस ठाण्यांसोबत रेल्वे सुरक्षा बलासोबत सतत संपर्कात आहोत. राजपूत कुटुंब मध्य प्रदेशातील खांडवा भागातील आहे. तेथे संपर्क साधून शहानिशा करण्यात आली. मात्र भुयारी मार्गातून ही मुले पुढे कुठे गेली याची माहिती काही केल्या हाती लागत नाही. सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,’ असे ते म्हणाले.

१११५६९ देशातील एकूण बेपत्ता बालक, युवक

५५९४४ शोध लागलेली

५५६२५ अद्याप बेपत्ता

९९८२ महाराष्ट्रातील बेपत्ता बालक

४३५७ बालकांचा शोध

५६२५ अद्याप बेपत्ता

(२०१६ पर्यंतची आकडेवारी)