मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाला स्फोटके शोधण्यास मदत करणाऱ्या श्वान पथकातील टायगर २६ जुलैला मरण पावल्यानंतर त्याच्या विरहामुळे शोकाकुल झालेला आणि तीव्र संधिवाताने पीडित त्याचा मित्र सिझर हा श्वान तणावात असून काही दिवसांच्या उपचारानंतर रविवारी ११ वर्षीय सिझरची रवानगी विरार येथील श्वानगृहात करण्यात आली आहे.
मुंबईवर २६-११ च्या दहशती हल्ल्यामधील पाच श्र्वानांपैकी सिझर एकमेव राहिला असून त्याच्या तब्बेतीची अधिक काळजी घेतली जात आहे. तीव्र संधिवाद असल्यामुळे त्याचे वजन वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी त्याच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश केला जात आहे. त्याबरोबरच वेळोवेळी त्यांच्या शरीराचा व्यायाम आणि गरम पाण्याने शेक दिला जात असल्यामुळे लवकरच त्यांच्या तब्बेतीत सुधार येईल असा विश्वास त्यांचा सांभाळ करणाऱ्या फिझाझ शहा यांनी व्यक्त केला आहे.
सिझरसोबतच्या चारही श्वानांच्या मृत्यूमुळे तो एकटा झाला होता. यामुळे तो काही दिवस तणावाखाली होता. मात्र वैद्यकीय उपचार आणि सोबत असलेल्या इतर श्वानांच्या सोबतीने तो हळूहळू बरा होत आहे असेही शहा यांनी सांगितले.