मानखुर्दमध्ये सोमवारी संध्याकाळी मूल चोरीच्या संशयावरून स्थानिक रहिवाशांचा जमाव हिंसक बनला आणि तो पांगवताना पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. जमावाच्या दगडफेकीत मानखुर्द पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार जखमी झाले.

पीएमजीपी कॉलनीत रविवारी रात्री चार वर्षांच्या बालिकेला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शहाजान नावाच्या महिलेला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सोमवारी दुपारी याच परिसरात एक महिला संशयास्पदरीत्या फिरताना रहिवाशांनी पाहिले. काही जणांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र या प्रसंगामुळे भांबावलेली महिला काहीच बोलू शकली नाही, त्यामुळे तीही मूल चोरण्यासाठी फिरत असल्याच्या संशयावरून जमावाने तिला मारहाण सुरू केली. इतक्यात मानखुर्द पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी तेथे पोचले. त्यांनी या महिलेला जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपड सुरू केली. पोलिसांच्या या कृतीने जमाव आणखी संतप्त झाला आणि त्यांनी दगडफेकीस सुरुवात झाली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस शिपाई जखमी झाले. तर एक पोलीस जीप फुटली. अखेर सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.