पुण्यातील जंगली महाराज मार्गावरील बालगंधर्व, देना बँक, गरवारे चौक आणि मॅकडोनाल्डबाहेर कचरा पेटी आदी ठिकाणी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी अटकेत असलेल्या आठ आरोपींसह पाच फरारी आरोपींवर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंबईतील विशेष ‘मोक्का’ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपींवर एटीएसने ३,७५० पानांचे आरोपपत्र दाखल केले.
असद खान, इमरान खान, सय्यद फिरोज, इरफान लांडगे, मुनीद मेमन, फारूख बागवान, सय्यद आरिफ, अस्लम शेख या अटकेत असलेल्या आरोपींसह कटाचा सूत्रधार रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, फय्याज काझी, असमद, अब्दुल्ला या पाच फरारी आरोपींवर एटीएसने आरोपपत्र दाखल केले. त्यांच्यावर स्फोटांचा कट रचण्याच्या मुख्य आरोपासोबत बेकायदेशीर कारवाई कायदा, स्फोटके कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि मोक्का कायदा अशा विविध कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. जर्मन बेकरी स्फोटानंतर पुन्हा एकदा जंगली महाराज मार्गावरील या साखळी बॉम्बस्फोटाने पुण्याला हादरवले होते.