मराठी साहित्यातील ‘ज्ञानतपस्वीनी’ दुर्गाबाई भागवत यांनी देशावर लादल्या गेलेल्या आणीबाणीला प्रखर विरोध केला होता. सभा, संमेलने आणि लेखनातून त्यांनी या विषयीची आपले मते निर्भिडपणे मांडली होती. पोलिसांनी दुर्गाबाई यांना एशियाटिक सोसायटीच्या आवारात केलेली अटक आणि त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात नेऊन त्यांच्या हाताच्या बोटांचे घेतलेले ठसे या आठवणींना ज्येष्ठ समीक्षक अशोक शहाणे यांनी शुक्रवारी मुंबईत उजाळा दिला.
एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये दुर्गाबाई भागवत यांचे तैलचित्र लावण्यात आले. या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी  शहाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही आठवण आपल्या खास मिश्किल शैलीत श्रोत्यांसमोर उलगडली.
पोलिसांनी दुर्गाबाई यांना अटक करण्याचे ठरविले होते. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला अटक कशी करायची हा त्यांच्यापुढेही प्रश्नच होता. मग पोलिसांनी एक शक्कल लढविली. त्यांनी दुर्गाबाई यांच्या घरी दूरध्वनी केला आणि विचारले दुर्गाबाई असतील तर त्यांचे एक व्याख्यान ठरविण्यासाठी बोलायचे आहे. त्या घरी नाहीत असे सांगितल्यावर मग त्या कुठे भेटतील, असा प्रतिप्रश्न पोलिसांनी केला. त्यावर दुर्गाबाई एशियाटिक सोसायटीमध्ये भेटतील, असे उत्तर मिळाल्याचे सांगून शहाणे म्हणाले की, एशियाटिक सोसायटीमधून बाहेर पडण्याच्या प्रत्येक वाटेवर पोलीस उभे होते. काही पोलीस अधिकारी एशियाटिकमध्ये आले आणि त्यांनी आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आल्याचे दुर्गाबाईंना सांगितले. मी जेवून घेते आणि मग मला अटक केली तर काही हरकत नाही ना, असा सवाल दुर्गाबाईंनी पोलिसांना केला.
पोलिसांनी हरकत नसल्याचे सांगताच दुर्गाबाई आणि आम्ही एशियाटिकच्या उपहारगृहात जेवायला गेलो. आमच्या मागोमाग पोलिसही तेथे आले. पोलिसांना पाहताच दुर्गाबाईंनी त्यांना तुम्ही काही खाणार, चहा घेणार का विचारले. पोलिसांनी सांगितले की आम्ही आमचा चहा पिऊ. जेवण झाल्यावर पोलिसांच्या गाडीत बसवून त्यांना क्रॉफर्ड मार्केट येथे पोलीस आयुक्त कार्यालयात नेण्यात आले आणि तेथे त्यांच्या दोन्ही हातांचे ठसे घेण्यात आले. पोलिसांच्या लेखी त्या आता एक आरोपी झाल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत मी खाली गाडीत बसून होतो. त्यावेळी गाडीचा चालक एका पोलिसाला म्हणाला, अहो, फार डेंजर बाई आहे त्या. सांभाळून राहा.. शहाणे यांनी या आठवणीला उजाळा देताच श्रोत्यांमध्ये हास्याची लकेर उमटली.
पुढे दुर्गाबाई यांना आर्थर रस्ता कारागृहात नेण्यात आले. तेथे त्या काही महिने बंदीवासात होत्या. येथे त्यांनी ‘जातक कथा’चे भाषांतर केले. एशियाटिक हे दुर्गाबाई यांच्यासाठी कल्पनांचे घर होते. दुगाबाई यांचे तैलचित्र येथे लावले ते ठिक आहे, पण पोलिसांनी त्यांच्या हातांचे जे ठसे घेतले ते येथे लावायला हवे होते, असे सांगतानाच एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अंजली किर्तने यांना भेटून दुर्गाबाई यांचे अपूर्ण राहिलेले काम, कसे पुढे नेता येईल, त्यावर विचार करावा, अशी सूचनाही केली.