वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियोजन होत नसल्याचा दावा

आठ तासांच्या तीन पाळ्यांबाबतच्या धरसोड नियोजनामुळे मुंबई पोलीस दलातून नाराजीचे सूर उमटत आहेत. भांडुप विभागातील एका पोलीस हवालदाराने (चालक) चार तास जास्त काम केल्याबद्दल अतिरक्त मोबदल्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शासनदरबारी तशी तरतूद नसल्यास जादा काम करण्याचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खिशातून मोबदला द्यावा, असे सुचवले आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मे २०१६ मध्ये आठ तास कर्तव्याचा प्रयोग देवनार पोलीस ठाण्यापासून सुरू केला. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबईतल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदापर्यंतच्या मनुष्यबळाचे आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये काम सुरू करण्यात आले. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवून उपनिरीक्षकांनाही त्यात सामावून घेण्यात आले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यांत तीन पाळ्या सुरू होत्या. आचारसंहिता लागू झाल्यापासून मजमोजणीपर्यंत काही पोलीस ठाण्यांनी आठ तासांऐवजी बारा तासांच्या दोन पाळ्यांमध्ये काम सुरू केले. निवडणूक आटोपल्यानंतरही हा विस्कळीतपणा सुरूच आहे. या आठवडय़ात राज्य पोलीस मुख्यालयाकडून ईद, मोहरम सणांचे निमित्त करून मुंबई वगळता उर्वरित राज्यातील पोलिसांच्या सुटय़ा रद्द केल्या. प्रत्यक्षात सुटय़ा रद्द करण्याचा निर्णय अयोध्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात आल्याचे समजते. मुंबईतही काही पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पातळीवर सुटय़ा रद्द करणे, रजेवर गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू करून घेणे आणि आठ तासांऐवजी १२ तासांची पाळी करणे हे निर्णय परस्पर घेण्यात आले.  सण, उत्सव, महापुरुषांची जयंती असे वर्षांतून आठ दिवस सुटय़ा रद्द असतात. तसा शासनाचा आदेश आहे. मात्र आवश्यकता नसताना कामाचे तास बदलते ठेवणे, त्यात एकसूत्रता नसणे, हा मनमानी कारभार असल्याच्या प्रतिक्रिया पोलीस दलातून उमटल्या आहेत.

भांडुप विभागातील कॉम्बॅट व्हॅनवरील (२६/११ हल्ल्यानंतर विशेष उद्देशाने निर्माण केलेले वाहन) पोलीस हवालदार चालक विकास नागे यांनी मंगळवारी परिमंडळ सातच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाला लेखी अर्ज करून चार तास अधिक काम केल्याचा मोबदला मागितला.  रात्रपाळी करून दुसऱ्या दिवशी हजर करून घेताना सहायक आयुक्तांनी आठऐवजी १२ तास कर्तव्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावले. त्याची नोंद कॉम्बॅट व्हॅनमधील लॉगबुक किंवा नोंदवहीत सापडेल, असे विकास यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

याबाबत विचारले असता आठ तासांचे कर्तव्य हा नियम नाही. हा प्रयोग होता. तो सध्या मुंबईच्या पोलीस ठाण्यांमध्ये सुरू आहे. परिस्थितीनुसार कामाचे तास कमी केले जातात, वाढवले जातात, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी व्यक्त केली.