|| नमिता धुरी

पोलीस, आरोग्य, सफाई यंत्रणांची रस्त्यावर करोनाशी झुंज

 

मुंबई : एकीकडे मुंबईसह अवघ्या देशातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे, सरकारी, सुरक्षा यंत्रणेतील एक मोठी फळी करोना आणि समाज यांच्यामध्ये भिंत बनून रस्त्यावर अहोरात्र उभी ठाकली आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यांची अपेक्षा एकच ‘आम्ही तुमच्यासाठी बाहेर आहोत. तुम्ही घरातच थांबा!’

सर्व उद्याने बंद असल्याने रोज किमान प्रभात फेरीसाठी तरी घराबाहेर पडणारे आई-वडील आज घरात बसून आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने मुलेही घरातच आहेत. खासगी कार्यालये बंद असल्याने नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्र सगळे घरी बसून आराम करत आहेत. अशावेळी घरातला एक सदस्य पहाटे उठतो, मिळतील ते चहाचे दोन घोट घशाखाली ढकलतो आणि घराबाहेर पडतो. कारण बंद हा सर्वसामान्यांसाठी असतो आणि घराबाहेर पडणारी ही मंडळी असामान्य आहेत. कोणी पोलीस आहे, कोणी सफाई कामगार, इत्यादी.

रविवारी रेल्वे स्थानकांवर फक्त एका प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात होता. आवश्यक प्रवास करणाऱ्यांना ओळखपत्रे पाहून, नावनोंदणी करून प्रवेश दिला जात होता. त्यासाठी पालिके चे सुरक्षा कर्मचारी, आरपीएफ, महाराष्ट्र पोलीस यांना नेमण्यात आले होते. ‘रेल्वे स्थानक बंद होणार आहे हे काही जणांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांना परत पाठवावे लागले. आम्ही दोन-तीन पाळ्यांमध्ये काम करत आहोत’, अशी माहिती बोरिवली येथे तैनात असणारे तहसिलदार कार्यालयाचे कर्मचारी दर्शन जाधव यांनी दिली.

दादर वाहतूक विभागाचे अंमलदार देवेंद्र थोरात दादरच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ तैनात आहेत. ‘अजूनही काही लोकांना  परिस्थितीचे गांभीर्य नाही. मुंबईत एवढा शुकशुकाट कधी पाहिलेला नाही. त्यामुळे काय चाललंय हे पाहायला लोक बाहेर पडतात. पोलिसांनी थांबवले की वैद्यकीय कारणे देतात. कठोर कारवाई के ल्याशिवाय त्यांना समज येणार नाही. पैसे कमावण्यापेक्षाही देशाची सेवा करण्यासाठी आम्ही अत्यावश्यक सेवेत आहोत. संकटकाळी पळ काढू शकत नाही. कामावर यावेच लागते. त्यामुळे कु टुंबाला गावी पाठवले आहे’, असे थोरात यांनी सांगितले.

माहीमला राहणाऱ्या पालिके च्या सफाई कामगार वज्रेश्वरी टके कार रविवारी पहाटे ४ वाजता उठल्या. ‘आज बंद आहे, तर नको जाऊस कामावर’, असे मुले सांगत होती. पण, ‘गेली १३ वर्षे मी काम करतेय. आणखी एक दिवस के लं तर कु ठे बिघडलं ?’ असे म्हणून वज्रेश्वरी घराबाहेर पडल्या आणि ६.३० वाजता मरोळला कामाच्या ठिकाणी पोहोचल्या. ‘आज लोक नाहीत रस्त्यावर. पण कालचा कचरा होताच. शिवाय पालापाचोळाही असतो.  स्वच्छता करताना संसर्गाचा धोका आम्हालाही असतो, पण हिंमत करुन उतरावे लागते’, असे वज्रेश्वरी म्हणाल्या.

‘आमची अत्यावश्यक सेवा असल्याने घरातल्यांचीही मानसिक तयारी झाली आहे. ७ च्या डय़ुटीसाठी पहाटे ४ वाजता घरातून निघतो. त्यामुळे जेवणाचा डबाही मिळत नाही. जेवणाची काही तरी व्यवस्था करावी लागेल’, असे दादर स्थानकावर तैनात असलेले पालिके चे सुरक्षा कर्मचारी अनिल सावंत म्हणाले. ‘रिकाम्या बसमुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होते. पण अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरु ठेवावी लागते. सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत फक्त १५ रुपये मिळाले’, असा रविवारच्या दिवशीचा अनुभव बेस्टचे वाहक माधव लेलके  यांनी कथन के ला.

सुट्टीच्या हमीवर डबा मिळाला!

‘बंदमुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक आहे. त्यामुळे तिकीट तपासनिसांचे काम कमी झाले. मात्र आम्हाला दिवस भरावाच लागतो’, असे बेस्टचे तिकीट तपासनीस दिलीप माने म्हणाले. आपल्या आरोग्याच्या काळजीमुळे कु टुंबियांनी कामावर जाऊ नका असा आग्रह धरला होता. बायको तर डबाच द्यायला तयार नव्हती. मात्र उद्या सुट्टी घेतो असे आश्वासन दिल्यावर डबा मिळाल्याचे माने यांनी सांगितले.

वाढदिवस असतानाही कामावर

सुरक्षेप्रमाणे आरोग्य क्षेत्राशी संबंधित कर्मचारीवर्गही बंदकाळात कार्यरत आहे. ‘करोनाचे रूग्ण आले तर परिस्थिती कशी हाताळायची याचे मॉक ड्रील रूग्णालयात घेण्यात आले. कु टुंबियांची इच्छा असते की आपण घरात थांबावे. पण आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतो. त्यामुळे माझा वाढदिवस असतानाही मी सुट्टी घेतली नाही’, असे जे. जे. रूग्णालयाचे डॉ. रेवत कानिंदे यांनी सांगितले. डॉक्टरांप्रमाणेच परिचारिका, रूग्णालयांचे आणि महत्त्वाच्या इमारतींचे सुरक्षा रक्षकही बंदकाळात सेवेत आहेत.