प्रसाद रावकर

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करून मुंबईचा क्रमांक उंचावण्यासाठी मुंबई पोलीसही पालिकेच्या मदतीला सरसावले आहेत. पालिका आणि पोलीस आयुक्तांच्या समन्वयातून आखण्यात आलेल्या या योजनेनुसार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बकाल झोपडपट्टय़ा व रस्ते दत्तक घेऊन पोलीस तेथे स्वच्छता राहावी, यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे अस्वच्छता करणाऱ्या रहिवाशांवर अंकूश बसू शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या विनंतीनुसार पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इतकेच नव्हे तर मुंबई पोलीस दलाने मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. झोपडपट्टय़ांच्या अस्वच्छतेमुळे संपूर्ण शहराला बकाल रूप आले आहे. अशा वस्त्यांमध्ये जागोजागी दिसणाऱ्या कचऱ्यामुळे तेथून चालणेही कठीण होते. या पाश्र्वभूमीवर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील झोपडपट्टी, रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. एका पोलीस ठाण्याला आपल्या हद्दीतील तीन ठिकाणे दत्तक घ्यावी लागणार आहेत. ही ठिकाणे दत्तक घेतल्यानंतर तेथील रहिवाशांची मानसिकता बदलण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.

दत्तक योजना राबविताना पोलीस ठाण्यांना पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अनुज्ञापन विभाग, दुकाने आणि आस्थापना विभाग, आरोग्य विभागामार्फत मदतीची रसद पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना प्रबोधनही करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर मुंबईत स्वच्छता राखली जावी यासाठी आठवडय़ातून दोन वेळा पोलीस स्वत: श्रमदान करणार आहेत.

पोलीस वसाहती आणि पोलीस ठाणी कचरामुक्त करण्याचा निर्धार या योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासाठी पोलीस वसाहतींमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे  वर्गीकरण करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. घरोघरी कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी करावी याबाबत पालिकेच्या सहकार्याने पोलीस नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला असून ही योजना कशा पद्धतीने राबवावी याबाबत पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर ही योजना समन्वयातून यशस्वी करण्यासाठी वॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

पालिका आणि पोलीस दलाच्या समन्वयातून दत्तक योजना आकारास आली असून या योजनेनुसार झोपडपट्टी, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे पोलीस ठाण्यांमार्फत दत्तक घेण्यात येणार आहेत. दत्तक घेतलेल्या ठिकाणी प्रबोधन करण्यात येणार आहे.

– सुभाष दळवी, ‘स्वच्छ भारत’चे विशेष कार्यअधिकारी